मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता जवळजवळ ओसरली आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राने मंगळवारी लसीकरणात दहा कोटींचा टप्पा गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
‘महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले आहे. मी सर्वांचे अभिनंदन करतो’, असे ट्विट आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.
राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. अलीकडेच ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाने गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला होता. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदार संघाची रहिवासी आहे.