नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१६ मध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यानचा विराट कोहलीला संघातून वगळले जाणार होते, असा खुलासा माजी सलामीवीर वीरेंदर सेहवागने केला आहे.
निवड समितीला विराट कोहलीला वगळायचे होते, परंतु मी आणि धोनीने त्याला पाठिंबा दिला. निवड समितीला २०१२मध्ये पर्थमध्ये विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला खेळवायचे होते. मी उपकर्णधार होतो आणि महेंद्रसिंग धोनी संघाचे नेतृत्व करत होता आणि आम्ही ठरवले, की विराटला पाठिंबा द्यायचा. तसे केले, असे सेहवाग म्हणाला. धोनी आणि सेहवागचा हा निर्णय विराटच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला आणि तेव्हापासून त्याला एकदाही संघातून वगळण्यात आलेले नाही. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४४ धावा केल्या आणि त्यानंतर ७५ धावा केल्या. भारताने हा सामना एक डाव आणि ३७ धावांनी गमावला.
कोहलीच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात संस्मरणीय नव्हती. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या मालिकेत तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ ७६ धावा केल्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले आणि संघात परतल्यानंतरही त्याने आपला बराचसा वेळ पॅव्हेलियनमध्येच घालवला. विराट कोहलीने अखेरीस त्या वर्षीच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत संघात स्थान मिळवले. त्याने ऑस्ट्रेलियाचाही दौरा केला. तिसऱ्या कसोटीपूर्वी विराट पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधील स्थान गमावण्याच्या मार्गावर होता.