नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फलकावर पुरेशा धावा नसणे आणि पॉवर-प्लेचा योग्य वापर नाही, अशा अनेक कारणांमुळे युएईत झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताला उपांत्य फेरीत पोहोचता आले नाही, असे मत विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
पॉवर-प्लेमध्ये दोनच क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर उभे असतात. भारताने मागील काही आयसीसी स्पर्धांमध्ये पॉवर-प्लेचा योग्य वापर केलेला नाही. त्यामुळे चांगली गोलंदाजी असलेल्या संघासमोर धावसंख्या उभारता येत नाही. यात बदल होणं गरजेचे आहे, असे गावस्कर यांनी सांगितले. पराभवानंतर प्लेईंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करू नये, असं गावसकर यांनी सांगितलं. भारताने आपल्या संघात बदल केले आणि त्यामुळे संघाच नुकसान झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय संघात खूप सारे बदल करणं चुकीचं आहे. दोन सामन्यात फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळेत भारतीय संघ इथे पोहोचला आहे. या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे, असे गावस्करांनी म्हटले.
आयपीएलमधील सहभागी क्रिकेटपटूंची कामगिरी पाहता यंदा वर्ल्डकप जेतेपदासाठी टीम इंडियाला पसंती मिळाली होती. मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या. तर धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीचा मार्गही बंद झाला आहे.