Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीज्ञानदेव वानखेडेंचा मलिकांविरोधात दावा; उद्या सुनावणी

ज्ञानदेव वानखेडेंचा मलिकांविरोधात दावा; उद्या सुनावणी

मुंबई (प्रतिनिधी) : खंडणीचा आरोप झालेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात सोमवारी केलेल्या दाव्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने मलिक यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे खंडणी वसुली करतात. त्यासाठी खोटी प्रकरणे उभी करतात. आर्यन खान, समीर खान यांच्यासह अन्य २६ प्रकरणांची यादीच मलिक यांनी जाहीर केली होती. ही सर्व प्रकरणे बोगस असून त्यातील साक्षीदार समीर वानखेडे यांच्या जवळचे आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता. वानखेडे हे फ्रॉड असल्याचे सिद्ध करण्यासाठी मलिक यांनी त्यांचा जन्म दाखला, पहिल्या निकाहाचे फोटो व वडिलांचे नाव असा तपशीलही जाहीर केला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा दावाही मलिक यांनी केला होता.

मलिक यांच्या या आरोपांमुळे गेल्या महिनाभरापासून वानखेडे कुटुंब चर्चेत आहे. वानखेडे कुटुंबीयांनी मलिक यांचे आरोप फेटाळल्यानंतरही मलिक नवनव्या गोष्टी पुढे आणत आहेत. त्यामुळे संतापलेल्या ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ‘मलिक हे रोज नवे निराधार जाहीर आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियातून धमक्या मिळत आहेत. आमच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. याचा आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे’, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी अर्जात म्हटले आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज सुनावणीसाठी आला तेव्हा खंडपीठानं मलिक यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली.

समीर वानखेडे यांनी फेटाळले आरोप

क्रांती रेडकरच्या बहिणीवर २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल. मी सप्टेंबर २००८ मध्ये आयआरएस झालोय. २०१७ मध्ये माझे क्रांतीसोबत लग्न झाले. मग २००८च्या प्रकरणाशी माझा काय संबंध, असा उलट सवाल समीर वानखेडेंनी केला आहे.

पूजा ददलानीला समन्स

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली असून एनसीबीच्या एसआयटीबरोबरच मुंबई पोलीसही ‘अॅक्शन मोड’मध्ये आहेत. ड्रग्ज प्रकरणातील खंडणीच्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी नेमलेल्या एसआयटीने अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिला समन्स बजावले आहे. कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईत शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह १३ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान जवळपास महिनाभर कोठडीत होता. सध्या तो जामिनावर आहे. मात्र, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या टीमने केलेल्या अनेक कारवाया बोगस असून खंडणीसाठी घडवून आणल्याचा आरोप झाल्यानंतर एनसीबीने सहा प्रकरणांचा नव्यानं तपास सुरू केला आहे. त्यातच मुंबई पोलिसांच्या एसआयटीने पूजा ददलानी हिला समन्स बजावले आहे. मात्र, प्रकृतीचे कारण देत पूजाने वेळ मागून घेतल्याचे समजते.आर्यन प्रकरणातील प्रमुख पंच साक्षीदार किरण गोसावी याने शाहरुख खानकडून ५० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप अन्य साक्षीदारांनी केला आहे. ही रक्कम पूजा ददलानी हिनेच गोसावी याला दिली होती, असे समोर आले आहे. याच प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत आहेत.

किरण गोसावी तुरुंगातच

क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती. दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. आता पुन्हा त्याला आणखी एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. फिर्यादीचे वकील राहुल कुलकर्णी युक्तिवाद करताना म्हणाले की,आरोपी किरण गोसावी याच्याकडून तीन लाखांपैकी एक लाख मिळविण्यामध्ये यश आले आहे. तसेच त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचा पासवर्ड मिळणे आवश्यक आहे. त्यातून आणखी माहिती पुढे येण्यास मदत होईल.

प्रकरण शेवटापर्यंत नेण्याचा पवारांचा सल्ला…

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करीत अनेक नावे समोर आणली आहेत, तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपच्या वतीने आरोप सुरू झाले आहेत. मात्र, हे प्रकरण आता शेवटापर्यंत न्या, असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. समीर वानखेडे यांनी आर्यन खानला फसवून त्याचे अपहरण केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर प्रकरणाला नवीन वळण लागले. या प्रकरणात आतापर्यंत त्यांनी अनेक आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रापासून ते त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप नोंदविले आहेत. या प्रकरणात साक्षीदारच आरोपी ठरत आहेत. तर ज्यांच्यावर आरोप आहे ते कसे बळीचे बकरे ठरवले जातात हे सिद्ध करण्याचा खटाटोप सुरू आहे. यातच भाजपच्या मोहित कंबोज यांनी उडी घेतल्याने याला आता आणखी राजकीय वळण लागले आहे. मात्र, मोहित कंबोज हे कसे भ्रष्ट आहेत हे दाखवणारी माहिती मलिक यांनी माध्यमांसमोर उघड करीत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -