मुंबई (प्रतिनिधी) : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाचा पत्ता सोमवारी दोन संशयास्पद व्यक्तींनी विचारला असल्याचे वृत्त आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांना ही माहिती दिली. ऊर्दूमध्ये बोलणाऱ्या दोघांनी पत्ता विचारला असल्याची माहिती टॅक्सी ड्रायव्हरने पोलिसांना दिली. त्यानंतर सावधगिरी म्हणून अँटिलिया परिसराची मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.
अँटिलियामध्ये २७ मजले आहेत. या घराची किंमत जवळजवळ ६००० कोटी रु. आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत २ बिलियन डॉलर (जवळजवळ १२५ अब्ज रुपये) एवढी आहे. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार एका दाढीवाल्या व्यक्तीने किला कोर्टसमोर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अंबानींच्या घराचा पत्ता विचारला.
ज्या संशयित व्यक्तींनी पत्ता विचारला त्यांच्याकडे सिल्व्हर रंगाची वॅगनर कार होती. दोघेही ऊर्दू भाषेत बोलत होते आणि त्यांच्याकडे एक बॅग होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून नाकाबंदी करण्यात आली आहे.
पोलिसांनी कारच्या नंबरद्वारे त्यांची माहिती मिळवण्यासाठी आरटीओशी संपर्क केला; परंतु त्यांच्याकडे माहिती मिळाली नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.