मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण व अन्य पाच प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबी महासंचालकांनी दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले असून हे पथक शनिवारी मुंबईत दाखल झाले आहे. या तपासाची सूत्रे आता एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याऐवजी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्याकडे असतील. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबी मुंबई युनिटच्या टीमने छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ही कारवाई अनेक कारणांनी देशभर गाजत आहे. यात खंडणीवसुलीचा दावा करण्यात आला असून मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या आरोपांची आधीच एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. ही सगळी पार्श्वभूमी असताना शुक्रवारी एनसीबी महासंचालकांनी मोठा निर्णय घेत आर्यन खान ड्रग्ज प्रकरण व अन्य पाच प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली. ही एसआयटी आता या सर्व प्रकरणांचा तपास करणार आहे. त्यात समीर वानखेडे आणि त्यांची टीम साह्य करेल, असे नमूद करण्यात आले आहे.
एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले की, एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय आहे.
आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करीत होते. या प्रकरणावरून त्यांना हटवल्याची चर्चा रंगू लागली. तथापि, याबाबत समीर वानखेडे यांनी खुलासा केला आहे. मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अफवांना बळी पडू नका
आर्यन खान प्रकरणावरून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. याचसंदर्भात आता वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्विट करत, समीर यांना हटवण्यात आलेले नाही. अफवांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. तसेच एनसीबीचे पत्र देखील ट्विटरवरुन शेअर केले आहे.