स्टेटलाइन : सुकृत खांडेकर
काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पुढील वर्षी विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात परिषद झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच त्या त्या राज्यांचे खासदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, प्रमुख नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारने राबवलेल्या आणि भाजपशासित राज्यांनी आखलेल्या कल्याणकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असेही सांगितले.
परिषद संपल्यावर उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देवसिंह यांनी राज्यातील खासदारांची स्वतंत्र बैठक घेतली. प्रत्येकाला बोलावून त्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेणे सुरू केले. आजवर काय केले, काय केले पाहिजे, कोणत्या त्रुटी दुरुस्त केल्या पाहिजेत, अशी खासदारांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा सुरू झाली. बैठक संपवून निघालेल्या मोदींच्या ही बाब लक्षात आली. ते निघालेले थांबले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडून तातडीने काही फायली मागावून घेतल्या आणि जिथे खासदारांची बैठक चालू होती तेथे पोहोचले. मोदीजी अचानक आलेले बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. स्वत: स्वतंत्रदेव सिंह उभे राहिले. मोदींनी आपली फाईल त्यांच्या हाती दिली आणि म्हणाले, मला या बैठकीला का नाही बोलावले? मी उत्तर प्रदेशचा खासदार आहे. प्रगती पुस्तक देणे माझे काम आहे. मोदींनी आपल्या कामांची माहिती दिली. एवढेच नव्हे, तर रिपोर्ट कार्डमध्ये त्रुटी असल्यास सांगावे अशी प्रदेशाध्यक्षांना विनंतीही केली. मोदी नंतर भाजप कार्यालयातून निघाले व पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. मोदींचे पक्षाच्या आढावा बैठकीत अचानक येणे आणि रिपोर्ट कार्ड सादर करणे हे सर्व थक्क करणारे होते. असा देशाने दुसरा पंतप्रधान आजवर बघितलेला नाही…देशाच्या इतिहासात प्रथमच असे घडले की, सर्व राजकीय शत्रूंची त्याने झोप खराब केली किंवा उडवली, त्या नेत्याचे नाव म्हणजे नरेंद्र मोदी. ‘भारताचा भाग्यविधाता’ असे त्यांना म्हटलेले आवडणार नाही, पण ‘सबका साथ सबका विकास’ असा मंत्र घेऊन रोज अठरा तास काम करणारा पंतप्रधान या देशाने यापूर्वी बघितलेला नाही.
‘मै इस देश का हनुमान हूँ, ये देश मेरा राम है; सीना चीर के दिखा दुंगा, अंदर बैठा हिंदुस्थान है…!’ असा देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान मोदींच्या रोमरोमात भिनला आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला. देशाच्या सर्वोच्च पदावर त्यांची निवड झाल्याचा अभिमान आणि आनंद महाराष्ट्राला वाटला. प्रतिभाताई या काँग्रेसच्या नेत्या. सार्वजनिक जीवनात काम करताना काँग्रेसचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्या म्हणतात – भले मै काँग्रेस पार्टीसे हूँ, लेकीन मै आज भारत देश की समाजसेविका के रूप से भारतीय जनता को कहना चाहती हूँ की, ‘‘नरेंद्र मोदी, ऐेसे एक इन्सान है, जो भारत देश को अच्छा राष्ट्र बना सकते है, क्योंकि उनमे वो निर्णय लेने की क्षमता है, जो भारत देश के देशवासियों को एक नई दिशा प्रदान कर सकते है. मैने देश के लिए एक राष्ट्रपती के रूप मे सेवा की है, मगर मैने कभी पीएम (प्रधानमंत्री) मोदी जैसा प्रधानमंत्री नही देखा.’’…
दिवंगत राष्ट्रपती झैल सिंग यांचे नातू इंद्रजित सिंग हे भाजपमध्ये आहेत. ते म्हणतात – ‘‘दादाजींची मनोकामना पूर्ण झाली. मी भाजपमध्ये जावे, ही त्यांची इच्छा होती.
जम्मू-काश्मीरला सत्तर वर्षांपासून दिलेले घटनेच्या ३७० कलमाचे कवच मोदींनी काढून घेण्याची हिम्मत दाखवली. मोदी केंद्रात सत्तेवर नसते, तर काश्मीरला मिळालेला विशेषाधिकार कधीच रद्द झाला नसता. काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी हजारो कोटींचा निधी देऊन विकास योजना राबवल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील तरुणांना शिक्षण व रोजगार त्याच राज्यात मिळावा, म्हणून विकासाचा आराखडा तयार केला. दुसरीकडे, दहशतवादाचा रक्तरंजित खेळ खेळणाऱ्यांनाही जबर धडा शिकवला जात आहे. तब्बल एकतीस वर्षांनी काश्मिरी हिंदूंनी श्रीनगरमधील गणेश मंदिरात पूजा व हवन केले, घंटानाद झाला, मंत्रोच्चारात विधी पार पडले, विधीला महिला व मुलेही मोठ्या संख्येने उपस्थित होती. हे कोणामुळे घडले, तर… मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले. सत्तर वर्षांच्या जाचक इस्लामिक नियमांतून काश्मीरला बाहेर काढण्याचे धाडस मोदी सरकारने करून दाखवले. अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत व हस्ते पार पडल्यावर विरोधी पक्षांनी नाके मुरडली. धर्मनिरपेक्ष देशात राम मंदिराचे भूमिपूजन मोदींनी कसे केले? असे प्रश्न विचारले गेले. धर्मनिरपेक्षता धोक्यात आली असाही टाहो काहींनी फोडला, पण हेच विरोधक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९४९ मध्ये पंडित नेहरू अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनाला गेले होते, हे सोयीस्कर विसरतात. हिंदुस्थानात हिंदूंना ताठ मानेने जगायला मोदींनी शिकवले, किंबहुना त्यांच्या नेतृत्वामुळे हिंदू निर्भय झाले, याचा राग धर्मनिरपेक्षवाद्यांना येत असावा.
मोदींनी संरक्षण दलाला आधुनिक शस्त्रे पुरवली. लढाऊ विमाने, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे, तोफखाना, रणगाडे यांची मोठी रसद पुरवली. एनसीआर व सीएए कायदे करून घुसखोरांना अडसर निर्माण केला, मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात मंदिरांवर होणारे हल्ले थांबले किंवा कमी झाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ममता बॅनर्जी यांनी पराभव केला, म्हणून काँग्रेस व डाव्या आघाडीला नि महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला आनंद झाला. पण प. बंगालमधील भाजपच्या आमदारांची संख्या ३ वरून ८० झाली, हे कसे दुर्लक्षित करता येईल? पश्चिम बंगालमध्ये अगोदर भाजपचे जमतेम दोन खासदार होते, ते आता १७ खासदार आहेत. ममता यांचा सुद्धा नंदीग्राममध्ये भाजपने पराभव करून दाखवला. वाराणसीत मोदींनी स्वत: अरविंद केजरीवाल यांचा ३ लाख ५७ हजार मतांनी पराभव केला किंवा अमेठीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा ५५ हजार मतांनी पराभव केला हे कसे पुसता येईल?
मोदींच्या लोकप्रियतेविषयी सर्वच विरोधी पक्षांना मळमळ आहे. जेवढा त्यांना मोदी आणि भाजपविषयी संताप येतो, तेवढा रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविषयी का येत नाही? मोदी कधीही निवडणुकीत हरले नाहीत. ते तीन वेळा थेट मुख्यमंत्री व दोन वेळा थेट पंतप्रधान झाले आहेत. असा चढताक्रम आणि यश देशात कुणालाच मिळालेले नाही. सलग वीस वर्षे ते सत्तास्थानावर आहेत आणि लोकसेवेला त्यांनी वाहून घेतले आहे. त्यांच्या वाढदिवसाला देशाने शंभर कोटी लसीकरण डोसचा टप्पा पूर्ण केला, हा विश्वविक्रम नोंदवला गेला. म्हणूनच ‘मोदी है तो मुमकीन है…!’