कोकणी बाणा : सतीश पाटणकर
खादी ग्रामोद्योग आयोग हा भारत सरकारचा महत्त्वाचा आयोग आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हा आयोग काम करतो. दी आणि ग्रामोद्योग आयोग ही केंद्र सरकार पुरस्कृत संस्था आणि राज्याराज्यांतून अस्तित्वात असलेली खादी-ग्रामोद्योग मंडळे हे भारतीय रेल्वेसारखेच एक वेगळे विश्व आहे. खादी-ग्रामोद्योगाचा व्याप आणि विस्तार रेल्वेएवढा नसला तरी महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणाऱ्या या आयोगाची स्वतंत्र ओळख आहे. खादी आणि म. गांधी यांचे नाते अतूट आहे. त्यामुळे खादी-ग्रामोद्योग आयोगाची कार्यालये, त्यांची प्रशिक्षण केंद्रे आणि विक्री केंद्रे या सर्वच ठिकाणी काहीशा आश्रमीय वातावरणाच्या खुणा हमखास आढळत, पण गेल्या काही वर्षांत सुती कापडाचे कपडे हीच फॅशन झाली; त्याची परिणिती खादीला बरे दिवस येण्यातही झाली.
दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमधले भव्य, बहुमजली खादी भांडार असो वा अन्य शहरांतली खादीची दुकाने असोत; आता तिथे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी वा २ ऑक्टोबरलाच काय ती गर्दी अशी स्थिती राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांत खादीने कात टाकली असून सर्व प्रकारच्या गृहोद्योगांतून, ग्रामोद्योगांतून आणि हस्तकला, कुशल कारागिरांच्या श्रमातून निर्माण झालेल्या व नैसर्गिक निर्मिती प्रक्रियेतून विकसित झालेल्या सेंद्रिय वस्तूंना खादी भांडारांनी सामावून घेतले आहे. यामुळेच, विशेषत: २०१४ नंतर ग्रामीण रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात मोठी भूमिका बजावणाऱ्या या उपक्रमाने उचललेली नवनवी पावले विशेष नोंद घेण्याजोगी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ग्रामीण विकासाच्या कार्यसूचीत खादी आणि ग्रामोद्योगाला मोठे प्राधान्य आहे. त्यामुळेच २०१५ मध्ये त्यांनी या आयोगासाठी एका पूर्णवेळ अध्यक्षाची नियुक्ती केली आणि ग्रामीण कारागिरांच्या ऊर्जितावस्थेचे एक व्यापक लक्ष्य समोर ठेवून नव्या टीमने काम सुरू केले. कारीगरी-रोजगार- उत्पादन-पणन आणि त्यातून आर्थिक सबलीकरण अशी एक शृंखला नव्याने आणि आणखी परिणामकारकरीत्या स्थापित व्हावी, यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाची टीम परिश्रमपूर्वक काही करू पाहत आहे. याचे परिणामही बहुआयामी आहेत. आता आतापर्यंत, कालबाह्य झालेल्या संकल्पांना भावनिकतेपोटी दिलेल्या अर्थसाहाय्यातून निर्माण झालेली एक सरकारपोषित अनुत्पादक संस्था ही खादी-ग्रामोद्योग क्षेत्रातील सरकारी उपक्रमांकडे पाहण्याची स्थापित दृष्टी होती; पण हे चित्र आता सपशेल बदलले आहे. हा आयोग २००४-२०१४ या काळात वर्षांकाठी सुमारे पाच कोटी रुपयांची संसाधने स्वत: निर्माण करीत असे, ती संख्या आता ८.१७ कोटींवर गेली आहे.
खादी भांडारांना सरकारीकरणाच्या चौकटीतून बाहेर काढून आधुनिक बाजार-व्यवस्थेशी जोडण्याचे प्रयत्नही कमालीचे यशस्वी झाले आहेत. २०१५ नंतर खादी भांडारे रविवारीही उघडी राहू लागली. या एका छोट्या बदलामुळे वर्षांकाठी सरासरी सात कोटी रुपयांची व्यवसायवृद्धी होऊ शकली. बाजारपेठेची कक्षा रुंदावल्याने उत्पादनही वाढले. २०१४ पर्यंत खादीच्या कापडाचे उत्पादन वार्षिक सरासरीच्या हिशेबात सुमारे नऊ कोटी चौरस मीटर एवढे होत होते, ते आता १५.६५ कोटी चौ. मी. पर्यंत वाढले आहे. २०१४ पूर्वीच्या दहा वर्षांत खादी ग्रामोद्योगाच्या उत्पादनांच्या विक्रीतून जे वार्षिक सरासरी उत्पन्न मिळत होते, त्यात २०१५ नंतर तब्बल दुपटीने झालेली वाढ विशेष नोंद घेण्याजोगी आहे. २०१५-१८ या काळात खादी-ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी नवी १००८ केंद्रे उघडण्यात आली असून देशभरातील विक्री केंद्रांची संख्या आता साडेआठ हजारांच्या पुढे गेली आहे. २०१६च्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ मध्ये प्रत्येकाने दरवर्षी खादीचे एक तरी वस्त्र स्वत: खरेदी करून वापरण्याचे आवाहन केले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
खनिज संपत्तीवर आधारित उद्योग
ग्रामीण कुंभार उद्योग, चुना उद्योग, दगड फोडणे-कोरणे, खडी करणे, नक्षीकाम करणे, दगडापासून बनविलेल्या उपयुक्त वस्तू, दगडी पाट्या व पेन्सिल तयार करणे, प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार करणे, भांडी साफ करण्याची पावडर, सरपणापासून कोळसा तयार करणे, सोने, चांदी, खडे शिंपले व कृत्रिम धातूपासून दागिने तयार करणे, रांगोळी तयार करणे, लाखेच्या बांगड्या बनविणे, रंगरोगण, वानिष, डिस्टेंपर बनविणे, काचेची खेळणी उत्पादन, सजावटीसाठी काच कापणे, डिझायनिंग, पॉलिश करणे, रत्ने कापणे.
वन संपत्तीवर आधारित उद्योग
हातकागद उद्योग, आगपेटी उद्योग, अगरबत्ती उद्योग, वाख उद्योग, गोंद उद्योग, वेत व बांबू उद्योग, काथ उद्योग, पेपर कप्स प्लेट्स व कागदाच्या वह्या तयार करणे, वाळ्याचे पडदे व केरसुणी तयार करणे, वन उत्पादने संकलन व प्रक्रिया व पॅकिंग उद्योग, फोटो उद्योग, लाख तयार करणे. शेतमालावर आधारित उद्योग – धान्यडाळी प्रक्रिया, पापड उद्योग, ग्रामीण तेल उद्योग, गूळ खांडसरी उद्योग, नीरा ताडगूळ उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, औषधी वनस्पती, फळ भाजी प्रक्रिया व परीक्षण उद्योग, तरटी चटया आणि हार तयार करणे, काजू प्रक्रिया, द्रोण उद्योग व पत्रावळी तयार करणे, तागापासून वस्तू बनविणे (वाख उद्योग), मका व रागीवरील प्रक्रिया, शेवया उत्पादन, विद्युतचलीत पीठ गिरणी, डाळे तयार करणे, तांदळाची साले काढणे, भारतीय मिष्टान्न उत्पादन, मेन्थॉल तेल, दुग्धजन्य उत्पादने तयार करणे, पशुचारा कुक्कुटखाद्य उत्पादन, रसवंती खाद्यपदार्थ स्टॉल युनिट.
पॉलिमर व रसायनांवर आधारित उद्योग
ग्रामीण चर्मोद्योग, अखाद्य तेल व आंघोळीचा साबण, रबराच्या वस्तू तयार करणे, रेक्झीनपासून वस्तू पी.व्ही.सी इ. वस्तू, शिंग व हाडे यांच्या हस्तदंती वस्तू, मेणबत्ती, कापूर व लाख तयार करणे, प्लास्टिकची पार्सल तयार करणे, टिकल्या बिंदी बनविणे, मेहंदी तयार करणे, सुगंधी तेल तयार करणे, शाम्पू तयार करणे, केशतेल निर्मिती, धुण्याचे साबण व पावडर तयार करणे, फिनाईल उत्पादने, लिक्विड हॅन्डवॉश, सॅनेटरी क्लीनर, सुतार काम, लोहार काम, ॲल्युमिनियम उद्योग, गोबर गॅस प्लॉट योजना, पेपरपिन्स, क्लिप्स, सेप्टी पिन्स, स्टीव्ह पिन्स आदी तयार करणे, शोभेचे बल्ब, बाटल्या तयार करणे, छत्री जोडणी करणे, सूर्य व वायू ऊर्जेची उपकरणे तयार करणे, हाताने पितळेची भांडी तयार करणे, हाताने तांब्याची भांडी तयार करणे, हाताने काशाच्या वस्तू तयार करणे, पितळ तांब आणि काशाच्या वस्तू तयार करणे, रेडियो काम, कॅसेट प्लेअर उत्पादन, रेडियो कॅसेट प्लेअर उत्पादन, रेडिओ कॅसेट रिकॉर्डचे उत्पादन, स्टॅबिलायझरचे उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स घड्याळाचे उत्पादन, लाकडावर कोरीव काम व फर्निचर तयार करणे, कल्हई करणे, मोटार वाईंडिंग, तारेच्या जाळ्या, लोखंडी ग्रील्स बनविणे, हातगाड्या, छोट्या सायकल रिक्षा आदी बनविणे, संगीत वाद्य तयार करणे.
वस्त्रोद्योग
खादी (सुती, रेशीम, लोकर), पॉलीवस्त्र (खादी व्यतिरिक्त), लोकवस्त्र, होजिअरी, शिवणकाम आणि तयार करणे, बाटिक वर्क, खेळणी व बाहुल्या बनविणे, सुताच्या व लोकरीच्या गुंड्या, लाची तयार करणे, भरतकाम, कापडावरील भरतकाम (पंचवर्क), वैद्यकीय पट्ट्या बनविणे, स्टोव्हच्या वाती बनविणे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)