अफगाणिस्तानविरुद्धच्या निकालावर ठरणार भारताचे भविष्य
अबुधाबी (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीतील शेवटच्या संडे स्पेशल (७ नोव्हेंबर) लढतींमध्ये पहिल्या सामन्यात ग्रुप २मध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. या लढतीत अफगाणिस्तान जिंकल्यास भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहतील. त्यामुळे टीम इंडियासाठी किवी संघ पराभव पत्करेल का, याची उत्सुकता आहे.
ग्रुप २मधून विजयाचा चौकार ठोकणाऱ्या पाकिस्तानने गटात अव्वल स्थान पटकावून दिमाखात सेमीफायनल प्रवेश केला आहे. दुसऱ्या स्थानासाठी सद्य:स्थितीत न्यूझीलंड प्रबळ दावेदार आहे. ४ सामन्यांत ३ सामने जिंकून ६ गुणांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत. अफगाणिस्तानच्या खात्यात ४ सामन्यांतून ४ गुण आहेत. स्कॉटलंडला हरवणाऱ्या भारताच्या खात्यातही समान गुण आहेत. मात्र, सरस रनरेटवर विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी तिसरे स्थान मिळवले आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यास त्यांचेही सहा गुण होतील. त्यानंतर शेवटच्या गटवार साखळी सामन्यात नामिबियावर मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास भारताचा संघ उपांत्य फेरीसाठी दावेदारी पेश करू शकेल. मात्र, न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर मात केल्यास रविवारीच सस्पेन्स संपुष्टात येईल. त्यामुळे न्यूझीलंडच्या पराभवासाठी भारताचे चाहते देव पाण्यात ठेवतील.
भारतासह स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवणाऱ्या न्यूझीलंडचे अफगाणिस्तानविरुद्ध पारडे जड आहे. पाकिस्तान वगळता त्यांना विजयासाठी फार प्रयास पडले नाहीत. मात्र, काही आघाड्यांवर सुधारणा करणे आवश्यक आहे. चार सामन्यांनंतर केवळ अनुभवी मार्टिन गप्टिलला अर्धशतकी मजल मारता आली आहे. त्याला डॅरिल मिचेलसह जेम्स फिलिप्स आणि कर्णधार केन विल्यमसनने फलंदाजीत त्याला चांगली साथ दिली आहे. परंतु, डेवॉन कॉन्व्हेला अद्याप फॉर्म गवसलेला नाही. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट तसेच स्पिनर ईश सोढीने बऱ्यापैकी सातत्य राखले आहे. अन्य वेगवान गोलंदाज टिम साउदी तसेच अन्य स्पिनर मिचेल सँटनरने निराशा केली आहे. पाचवा गोलंदाज म्हणून जेम्स नीशॅम आणि अॅडम मिल्नेला प्रभाव पाडता आलेला नाही. बॉलर्सचे अपयश किवींसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
अफगाण संघाने सातत्य राखले तरी त्यांचे दोन्ही विजय स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे आहेत. पाकिस्ताननंतर आणि भारतानंतर न्यूझीलंडच्या रूपाने त्यांच्यासमोर कडवा प्रतिस्पर्धी आहे. पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या अफगाणिस्तानच्या कामगिरीचा विचार केल्यास दोन्ही संघांविरुद्ध फलंदाजी थोडी फार चांगली झाली. मात्र, गोलंदाजांना अपेक्षित खेळ करता आला नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध अफगाणींची गोलंदाजी कितपत प्रभावी ठरते, त्यावर निकाल अवलंबून असेल. फलंदाजी चांगली होत असली तरी नजीबुल्ला झाड्रन वगळता अन्य कुठल्याही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. गोलंदाजी अनुभवी स्पिनर राशीद खान आणि मुजीब उर रहमानने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणता आले आहे. त्यामुळे बॉलिंगचा स्तर उंचावण्यासाठी या दुकलीला अन्य बॉलर्सकडून चांगली अपेक्षित आहे.
वेळ : दु. ३.३० वा.