गुलदस्ता : डॉ. मृणालिनी कुलकर्णी
वाचकहो! नमस्कार! कालच दिवाळी तारखेने संपली. तरी दिवाळीची झूल घरात प्रत्येकाच्या अंगावर झुलत आहे. दीपावली हा दिव्याचा, प्रकाशाचा तसाच नात्याचा सण; भेटीगाठीचा उत्सव. होय, सर्वांना एकत्र आणून बांधून ठेवणारा सर्व सणांचा गुलदस्ता म्हणजे दीपावली होय. या आनंदी वातावरणात अनेकजण इतरांचीही घरे प्रकाशमान करण्यात, आनंद पसरविण्यात हातभार लावतात. पणतीची ज्योत तेवत राहिली पाहिजे हे महत्त्वाचे. हाच दीपावलीचा उद्देश असतो.
माझ्या लहानपणी, पुण्याच्या हिंगणे संस्थेतील एक ज्येष्ठ मॅडम (नाव आठवत नाही) महिला भगिनींसाठी नित्यनियमाने अनेकांकडे अनेक वर्षे ठरलेल्या घरी स्वेच्छेने देणारी भाऊबीज न्यायला येत असत त्यांची आणि सैनिक कुटुंबासाठीही गोळा होणारी भाऊबीज आठवते. नातवंडात रमणारी माझी मोठी मैत्रीण सांगते, आम्ही गेल्या वर्षीचे घेतलेले सामान घरात असूनही प्रत्येक दिवाळीत मातीचे दिवे, रंग, रांगोळी, आकाशदिवा किंवा त्याचे कागद विकत घेतो. तेवढीच आपल्याकडून त्यांना मदत होते आणि गेल्या वर्षीच्या पणत्या झाडाखाली मातीत पुरतो. मातीचे देणं मातीला परत करतो.
दिवाळीच्या आधी व्हायरल झालेला व्हिडिओ आपण पहिला असेल, ‘अरे लल्ला, जब तक ये पणतीयां बीक न जाय, कायकी हॅपी दिवाली?’ त्या मुलाच्या एका कृतीने त्या अम्माच्या साऱ्या पणत्या विकल्या जातात. दीपावली हेच सांगते, विद्यार्थी युवकांनो; कुणाच्याही आयुष्यात ‘उम्मीद का एक दिया जरूर जलाना।’ निदान एकतरी घर प्रकाशमान करण्यास आपण हातभार लावूया. आज अनेक घरात प्राथमिक सर्व गोष्टी असतानाही चार भिंतीच्या आत वाद वाढलेले दिसतात. जीवनातला जगण्यातला आनंद कमी होत आहे. असे दिसते. स्वतःवरच प्रेम करणारे, स्वतःमध्येच मश्गूल असणारे, अनेक आहेत. जरा मनासारखे मिळाले नाही कि खट्टू होतात. त्याचवेळी दुसऱ्या एखाद्यात आनंद शोधावा हे सुचत नाही.
याच संदर्भातील वाचलेली गोष्ट शेअर करते.
एका गुरूच्या आश्रमातील कार्यकर्त्यांनी सर्व शिष्यांना फुग्यासोबत एक स्केचपेन दिले. शिष्य हो! फक्त तीन मिनिटांत त्या फुग्यावर आपले नाव आणि शोधत असलेल्या आनंदाचे नव लिहा. म्हणजेच तुम्हाला जी गोष्ट हवीहवीशी वाटते, ती लिहा. कोणाला पैसा, कोणाला प्रतिष्ठा, पद, कला, मनःशांती वगैरे… थोड्यावेळाने कार्यकर्त्यांनी गोळा केलेले सारे फुगे एका हॉलमध्ये ठेवले. गुरूने शिष्यांना संबोधले, हॉलमध्ये ठेवलेल्या शेकडो फुग्यातील तुम्ही तुमच्या नावाचा फुगा तीन मिनिटांत शोधायचा आहे. प्रत्येकाच्या हातात एक तरी फुगा हवा. वेळ संपली. शिष्यानी जो हाताला येईल तो फुगा उचलला. गुरूने विचारले, कोणाला स्वतःच्या नावाचा फुगा मिळाला? सारे शांत. गुरु हसले, पाहिलंत? आयुष्याचे हे असे असते, स्वतःच्या नावावर लिहून ठेवलेला फुगा असा अनेकवेळा निसटून जातो. स्वतःपुरता आनंद शोधणाऱ्याचे असेच होते. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारे, दुसऱ्याला आनंद देणारे ,खरे समाधानी असतात. आनंद घ्या,आनंद द्या.
स्मिता पाटील यांना वयाच्या विसाव्या वर्षी अभिनयाचं बक्षीस मिळालं. ते पारितोषिक दहा हजार रुपयाचं होतं. त्यांनी हे सगळे पैसे मेंदूच्या अक्षमतेमुळे अपंगत्व आलेल्या बालकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला [स्पॉस्टिक फ्रेंड्स क्लब] दिले. नंतरही त्यांचा त्या क्लबला त्या मुलांसाठी मदतीचा ओघ चालू होता. लक्षात ठेवा, “कामात जर आनंद असेल; तर जगण्यातही आनंद असतो.”
गुलदस्ता या सदरातून मी वाचलेले, पाहिलेले स्वतः अनुभवलेले काही मनातले विचार शेअर करणार आहे सर्वांसाठी! कई प्रकार के चुने हुए फूल, पान और कलियोंको सजाकर बंधा हुआ ये गुलदस्ता! मुख्यत्वे युवकांसाठी! आनंद घ्या, आनंद द्या.