नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील काही भागात एकीकडे आजही दिवाळीचे फटाके जोरदारपणे वाजत असताना, गरिबांच्या घरात अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील त्या घटकांच्या घरी दीप कधी उजळणार? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होत आहे.
आजही नवी मुंबईमधील उड्डाणपुलाखाली, सिग्नल यंत्रणा, पदपथावर, मोकळ्या भूखंडावर निराश्रित, बेघर, भिकारी घटक वास्तव्यास आहेत. या सर्व ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन दोन वेळचे जेवणही मिळण्याची भ्रांत आहे, तर याच ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे नवी मुंबईतील विविध ठिकाणी मागील चार दिवसांपासून दिवाळी साजरी करण्यासाठी होणारी धडपड सर्वांना दिसून येत असली तरी आर्थिक दरी, आर्थिक विषमता व आर्थिक दुर्बलतेमुळे काही कुटुंबं दिवाळी साजरी करण्यापर्यंत मजल मारू शकत नसल्याची सत्यता दिसून येत आहे.
प्रत्येक भारतीय हा सुदृढ असेल, तर देश बलवान बनू शकतो. यासाठी शासनाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आर्थिक दरी, विषमतेला दिवाळीच्या उत्सवात जाळून टाकणे अत्यंत गरजेचे असल्याचे आधार फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी सांगितले.
निवाऱ्याचा नाही पत्ता
सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत आजही प्लास्टिक फुगे, खेळणी विकणारी कुटुंबं आहेत. मंडळी दिवसभर आपल्या पत्नी, मूलबाळांना बरोबर घेऊन व्यवसाय करतात. त्यावेळीही त्यांच्या पोटाची खळगी भरतेच असे नाही. रात्र झाली की ही मंडळी दिसेल त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर आश्रयाला राहतात. अर्थात त्यावेळी त्यांच्या पोटाची खळगी भरली जाते की नाही, हा देखील एक प्रश्नच असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कणसे यांनी व्यक्त केले.