Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाउशिरा फुटलेले फटाके

उशिरा फुटलेले फटाके

स्कॉटलंडवर मोठा विजय; उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी धडपड सुरूच

दुबई (वृत्तसंस्था) : उशिरा का होईना, गवसलेला सूर आणि अननुभवी स्कॉटलंड संघावर मिळवलेला मोठा विजय पाहता भारताची टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची धडपड सुरू आहे.

दुबई स्टेडियमवर शुक्रवारी भारताने कमकुवत प्रतिस्पर्ध्यांवर आठ विकेट आणि ८१ चेंडू राखून एकतर्फी विजय मिळवला. ग्रुप २मध्ये अव्वल दोन संघांत मिळवायचे असल्यास स्कॉटलंडचे ८६ धावांचे आव्हान (?) किमान ७.१ षटकांत पार करायचे होते. मात्र, लोकेश राहुलच्या (१९ चेंडूंत ५० धावा) आतषबाजीच्या बळावर भारताने ६.३ षटकांत २ विकेटच्या बदल्यात आव्हान पार केले.

लोकेश राहुलने त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याने केवळ वैयक्तिक खेळ उंचावताना स्पर्धेतील दुसरी हाफसेंच्युरी मारली नाही तर उपकर्णधार रोहित शर्मासह अवघ्या ५ षटकांत ७० धावांची सलामी दिली. रोहितने १६ चेंडूंत ३० धावा करताना ५ चौकार आणि एक षटकार मारला. टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच ८१ चेंडू राखून विजय साकारला.

सलामी जोडी बहरली तरी भारताचा विजय पूर्वार्धात नक्की झाला. कर्णधार विराट कोहलीसाठी वाढदिवस लकी ठरला. त्याने प्रथमच टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताची गोलंदाजी खेळून काढण्यात स्कॉटलंडचे फलंदाज अपयशी ठरले. त्यांचा डाव १७.४ षटकांत ८५ धावांत आटोपला. स्कॉटलंडकडून केवळ ४ बॅटर्सना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात सलामीवीर जॉर्ज मुन्सीच्या (२४ धावा) आहेत. त्यांच्या तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने कोटा पूर्ण करताना १५ धावा देत ३ विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही (३-१-१५-३) अप्रतिम स्पेल टाकला. जसप्रीत बुमराने ३.४ षटके टाकताना एक ओव्हर मेडन टाकली. त्यानंतर १० धावा देत दोन विकेट टिपल्या. ऑफस्पिनर आर. अश्विनने एक विकेट घेतली.

भारताने झटपट विजय मिळवताना ४ सामन्यांतून २ विजयांसह ४ गुण मिळवत तिसरे स्थान मिळवले. भारताची सरासरी १.६१९ इतकी आहे. ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडपेक्षाही (१.२२७) भारताचा रनरेट अधिक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -