मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज नावाच्या १५ मजल्याच्या इमारतीत १४ व्या मजल्यावर भीषण आग लागली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री साडेआठ वाजता आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत दोन रहिवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या इमारतीत दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतला. त्यातून ही आग वाढत गेली अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. इमारतीच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. इमारतीच्या संपूर्ण १४ व्या मजल्यावर आग पसरली असून ५ जण अडकल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.