Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

त्यांना दुस-यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय

त्यांना दुस-यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय

दादरा नगर हवेली निकालावरून नारायण राणेंचा शिवसेनेला खोचक टोला!

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचे वेगळेच फटाके सध्या राज्याच्या राजकारणात फुटताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारला लक्ष्य करताना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील बोचरी टीका केली आहे. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीवरून लक्ष्य करताना, त्यांना दुस-यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला.

मी संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर आम्ही जिंकलो. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुस-यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच. कमला डेलकर निवडून आल्या. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता दिल्ली काबीज करणार म्हणताहेत. लिखाण करताना त्या व्यक्तीला भान नसेल. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का, हे मला माहीत नाही, असे नारायण राणे म्हणाले.

Comments
Add Comment