मात्र महाराष्ट्रात दिलासा नाही
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची घट केल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी त्याच्यावरचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कमी केला. त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, त्रिपुरा, आसाम यांच्यासारख्या भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसली; परंतु महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी सरकारचा पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सरकारी सूत्रांकडून समजते.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्याचा अनुषंगिक लाभ महाराष्ट्रात मिळणार आहे; परंतु काही राज्यांनी आपापल्या राज्यातले मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट कमी केल्याने त्या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव आणखी घटले आहेत. या जादा घटलेल्या भावाचा लाभ मात्र महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या ग्राहकांना मिळणार नाही.
महाराष्ट्र राज्यातील महसूल हा प्रामुख्याने दारूच्या उत्पादन शुल्कातून आणि पेट्रोल, डिझेलवरच्या मूल्यवर्धित करामधून मिळतो. कोरोना महामारीच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था मोठी डळमळीत झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरचा व्हॅट कमी न करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचे समजते.