राकेश जाधव
कोरोनानं सगळं काही थांबवलं. कधी नव्हे ते मनोरंजन विश्वही विशेषत: नाटक व चित्रपटगृहे बंद पाडली. कुणाच्या ध्यानीमनी नसतानाही मनोरंजन विश्वाला अजिबात नको असलेला एक सक्तीचा ‘इंटरव्हल’ घ्यावा लागला. पण आता त्या अंधाराचं जाळं फिटलं असून २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू झाली आहेत. (त्यातील प्रेक्षकांचं प्रमाण ५० टक्के असलं तरी पुन्हा सुरू होणं गरजेचं होतंच.) आता सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकही हीच प्रार्थना करत आहेत की, या मनोरंजनाला पुन्हा असा इंटरव्हल नकोच…!
अगदी बॉलिवूडपासून मराठी मनोरंजन विश्वालाही दिवाळी सण महत्त्वाचा वाटतो. दिवाळीनिमित्त प्रदर्शित होणारा चित्रपट आहे, रोहित शेट्टी दिग्दर्शित व अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशी.’ खरंतर हा चित्रपट गेल्या वर्षी २४ मार्चला प्रदर्शित होणार होता; परंतु २२ मार्चपासून देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि ‘सूर्यवंशी’ची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर तो आता ५ नोव्हेंबरला ऐन दिवाळीत प्रदर्शित होत आहे. दमदार अॅक्शन, देशभक्तीचा डोस, टिपिकल रोहित शेट्टी टच, अक्षयकुमार, अजय देवगण, रणवीर सिंग आणि कतरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट असल्यावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धो-धो चालेल, यात शंकाच नाही. ‘काहीही झालं तरी सूर्यवंशी चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित होईल,’ असं स्पष्ट मत रोहित शेट्टीनं व्यक्त केलं होतं. यातून आपल्या कलाकृतीबद्दल कमालीचा आत्मविश्वास असल्याचं रोहितनं अधोरेखित केलं.
बिग बजेट चित्रपट रांगेत
सलमान खानचा ‘अंतिम’, जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ आणि सैफ अली खान व राणी मुखर्जीचा ‘बंटी और बबली २’ असे बडे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून विशेष आकर्षण आहे, ते १९८३ साली भारतानं क्रिकेट विश्वचषक जिंकल्याचा ‘आँखों देखा हाल’चा अनुभव देणारा ‘८३’ या चित्रपटाचं. विश्वचषकाचा हीरो असलेल्या कपिलदेव यांची भूमिका रणवीर सिंग करणार असून दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. चित्रपट आणि क्रिकेटच्या फॅनची खूप मोठी संख्या भारतात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या चंदेरी पडद्यावर क्रिकेट पाहणं नेहमीच भारतीयांना आवडतं. भारतीय प्रेक्षकांची हीच नस ओळखून ‘८३’ च्या निर्मात्यांनीही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं नियोजन केलं आहे.
मराठीही मागे नाही
मराठी चित्रपटसृष्टीचीही कोरोनानं अमाप हानी केली; परंतु ते सारं मागे ठेवून मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. यातील पहिलाच सिनेमा आहे ‘जयंती’. ‘लोकांचा हक्काचा सण’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश नरवाडे यांनी केलं आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये मिलिंद शिंदे, किशोर कदम, पॅडी कांबळे, अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर या कसलेल्या कलाकारांसह ऋतुराज व तितिक्षा पदार्पण करत आहेत. त्यानंतर ‘झिम्मा’ (१९ नोव्हेंबर), गोदावरी (३ डिसेंबर), डार्लिंग (१० डिसेंबर) यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. यातील गोदावरी या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं असून जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या सर्वांसह प्रेक्षकांना विशेष आतुरता आहे, ती नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणाऱ्या ‘दे धक्का – २’ या चित्रपटाचं. २००८ सालच्या मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
नाट्यसृष्टीही सावरतेय…
चित्रपटांप्रमाणेच किंबहुना थोडासा जास्तच फटका बसलेली नाट्यसृष्टीही आता त्या सक्तीच्या इंटरव्हलनंतर मनोरंजनासाठी पुन्हा सज्ज झाली आहे, त्यामध्ये प्रशांत दामले यांनी आघाडी घेतली. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या त्यांच्या नाटकानं पुन्हा प्रेक्षकांनी आपली पावलं नाट्यगृहांकडे वळवली आहेत. तसेच, ‘तू म्हणशील तसं’ व ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या नाटकांचे पुन्हा प्रयोग सुरू झाले आहेत. जोडीला पुन्हा पूर्वीच्याच वेगात ‘पुन्हा सही रे सही’ धावू लागले आहे. त्यामुळे चित्रपटांप्रमाणेच आता नाट्यसृष्टीही मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.
ओटीटीचा धोका किती?
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सवय लागली. त्यात वेब सीरिजचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘सेक्रेड गेम्स’नं भारतात वेब सीरिजला व्यावसायिक सुरुवात झाली आणि त्यानंतर द फॅमिली मॅन (सीजन १ व २) व असुर, पंचायत, स्पेशल ऑप्स, स्कॅम १९९२ अशा काही वेब सीरिजनं जगभरातील प्रेक्षकांना ओटीटीचं वेड लावलं. त्यामुळे आता चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर किती प्रेक्षक प्रत्यक्षात जाऊन चित्रपट पाहतात? यावर या चंदेरी पडद्याचं भविष्य आधारित आहे, असं काही तज्ज्ञ सांगतात; तर दुसरीकडे ओटीटीचा चित्रपटगृहे आणि चित्रपटांवर फारसा परिणाम होणार नाही, असंही काही जाणकारांचं मत आहे. कुणाचं खरं ठरतं, हे येणारा काळच सांगेल.