तेजश्री प्रधान, अभिनेत्री
दिवाळीची चाहूल लागली की, अंगात नवा उत्साह संचारतो. दिवाळी हे प्रकाशपर्वच असतं. घरोघरी लागलेला प्रत्येक दिवा, विद्युत रोषणाई निराळा संदेश देत असते. हा सण घरातलाच नाही, तर मनातला अंध:कारही दूर सारतो. दिव्यांच्या प्रकाशात उदासीनता, निराशा नावालाही राहात नाही. वसुबारसपासून सुरू होणारी दिवाळी भाऊबीज आणि पुढे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत असते. या काळात वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता भरून राहिल्याची जाणीव वारंवार होत असते. तेजाळलेली ही पृथ्वी मनाला उभारी देत असते. आयुष्यातला अंध:कार दूर करून प्रकाशाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची वाट हा सण दाखवत असतो.
दिवाळी फक्त चार दिवसांची नसते, तर हे प्रकाशपर्व आपल्या मनात कायमचं घर करून राहतं. म्हणूनच मला दिवाळी खूप आवडते. खरं तर, अभिनयाच्या क्षेत्रात आल्यापासून माझी दिवाळी सेटवरच साजरी होत असते. चित्रीकरणादरम्यान सुट्टी मिळाली की, माझी पावलं घराकडे वळतात आणि कुटुंबीयांसोबत मी हे प्रकाशपर्व साजरं करते. मला पणत्या लावायला, घर सजवायला आणि या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने येणारी सकारात्मकता अनुभवायला खूप आवडतं. मला रांगोळी काढायलाही खूप आवडतं. प्रत्येक दिवाळी मला वेगळा अनुभव देऊन जाते. यंदाची दिवाळीही माझ्यासाठी खास आहे. कारण मी नुकतीच माझी निर्मिती संस्था सुरू केली असून माझा पहिला लघुपट प्रदर्शित होतो आहे. दिवाळीच्या निमित्ताने, दिवाळी या विषयाला वाहिलेला विषय मी लोकांसमोर आणते आहे. माझ्या लेखी दिवाळीचं महत्त्व काय आहे, हा सण मी कसा साजरा करते हे सगळं मी माझ्या लिखाणातून लोकांपर्यंत, चाहत्यांपर्यंत पोहोचवणार आहे.
दिवाळीतली माझ्या आवडीची खास गोष्ट म्हणजे फराळ. घराघरांमधून पदार्थांचा घमघमाट येऊ लागला की, दिवाळी जवळ आल्याची जाणीव तीव्र होऊ लागते. कुणी चकली करत असतं, तर कोणी बेसनाचे लाडू वळत असतं. यानिमित्ताने करंजी, कडबोळी, अनारसे, शंकरपाळी, शेव असं बरंच काही केलं जातं. अनारसे, शेव हे माझे विशेष आवडीचे पदार्थ असले, तरी फराळाच्या प्रत्येक पदार्थावर मी ताव मारते. अर्थात डाएटचं भान राखूनच! घरी फराळ बनत असताना मी मदतही करते. फराळ करता करता नात्यांचे बंध घट्ट होऊ लागतात. जावा-जावा, नणंद-वहिनी, सासू-सुना एकमेकींच्या मैत्रिणी कधी होऊन जातात हे कळत देखील नाही. एक-एक पदार्थ बनवण्यात प्रत्येकीचा हातखंडा असतो. इथे गृहिणीचं पाककौशल्य पणाला लागत असतं. मेहनतीने केलेल्या या फराळाचं होणारं कौतुक गृहिणीला वेगळाच आनंद देऊन जातं. गोडाधोडाचे पदार्थ करताना आणि खाताना हा गोडवा नात्यांमध्ये मुरत जातो.
दिवाळीत अनेकांच्या हातांना रोजगार मिळतो. विशेषत: महिला उद्योजिकांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देणारा हा सण आहे. आपल्या महिलांनी केलेला दिवाळीचा फराळ जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. कंदील, दिवे, पणत्या तयार करणारे आणि विकणारेही दिवाळीकडे डोळे लावून बसलेले असतात. दिवाळीसाठी सजलेला बाजार बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. सगळं कसं सकारात्मक वाटू लागतं आणि ही सकारात्मकता पुढे बराच काळ टिकून राहते.
मला वाटतं की, सणांचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. त्यातही गेलं वर्ष, दोन वर्षं प्रत्येकजण वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहे. अशा परिस्थितीत सण आपल्याला वेगळीच ऊर्जा देऊन जातात. एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो. गेला काही काळ आपलं अनेक कारणांनी मानसिक खच्चीकरण झालं आहे. पण दिवाळीसारखा प्रकाशमय सण या सगळ्यावर उतारा ठरतो. बाहेरचा प्रकाश आपल्या मनाला एक वेगळी उभारी देतो आणि आपलं जगणंच बदलून टाकतो. आपण आशेवर जगत असतो आणि जगण्यासाठी आशेचे किरण ठरतात ते आपले भारतीय सण. प्रत्येक सणाचं महत्त्व वेगळं, साजरा करण्याची पद्धत वेगळी; पण हे सण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली साथसंगत करत असतात. जगण्याला नवा अर्थ देत असतात. सण येणार म्हटल्यावर प्रत्येकजण उत्साहाने तयारीला लागतो. घरोघरी साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची तयारी तर खूप आधीपासून सुरू होते. घराच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली की, दिवाळीचे वेध लागायला सुरुवात होते. दिवाळीच्या लखलखाटात मनावरचं मळभही असंच दूर होत असतं. माणसं एकत्र येत असतात. गैरसमज दूर होत असतात.
आपण गणेशोत्सवही याच उत्साहाने साजरा करतो. मात्र यंदा गणपतीच्या वेळी तिसऱ्या लाटेचा धोका होता. पण सरकारने केलेले प्रयत्न, लादलेले कडक नियम तसंच मोठ्या प्रमाणावर झालेलं लसीकरण यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. ही दिवाळी जल्लोषात आणि आनंदात साजरी होत आहे. पुढे सगळं छान होईल, असा संदेश ही दिवाळी देत आहे, असं मला वाटतं. म्हणून ही दिवाळी आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची वाटत आहे. अर्थात, सगळं छान आणि गुडी गुडी वाटत असलं तरी कोरोनाचं संकट गेलेलं नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. मास्क लावून फिरणं कोणालाही आवडत नाही. मास्क लावणं हे आपल्याला एक बंधन वाटू लागलं आहे. पण जिथे आपल्याला पर्याय नाही, तिथे उगाचच बंड पुकारून उपयोग नसतो. त्यामुळे बाहेर गेल्यावर मास्क लावा. सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा. उगाचच गर्दी करू नका. दुसरं म्हणजे कोरोना विषाणूचा खूप मोठा परिणाम आपल्या श्वसनयंत्रणेवर होतो. त्यामुळे त्या दृष्टीने फटाके किती हानिकारक आहेत, हे शिक्षित व्यक्तीला वेगळं सांगण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे जमलं तर अगदी मोजकेच फटाके वाजवा किंवा अजिबात वाजवू नका.
आपण वेगवेगळ्या पद्धतींनी दिवाळी साजरी करू शकतो. विद्युत रोषणाई करून, पणत्या लावून, घर सजवून, छान छान कपडे घालून हीच नाही, तर प्रत्येक दिवाळी आपण साजरी करू या. फराळ बनवताना आपण आपली दु:खं काही काळ का होईना, बाजूला ठेवतो. मला वाटतं की, स्वयंपाक करणं, फराळ करणं हे वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन आहे. त्यामुळे घरात छान छान पदार्थ बनवून दिवाळी साजरी करा. पिढ्यानपिढ्या सुरू असलेला हा वारसा जपण्यासाठी एकत्र येऊ या. घरापुढे छानशा रांगोळ्या काढू या. रांगोळ्यांमधले रंग आपल्या आयुष्यातही रंग भरतील, यात शंका नाही. मात्र वातावरणातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललं असल्यामुळे फटाक्यांपासून दूर राहू या. वातावरणात उरलेला ऑक्सिजन आपल्यासाठी जपू या.
नव्या वर्षाच्या निमित्ताने आपण अनेक संकल्प करतो. दिवाळी पाडवा म्हणजेच प्रतिपदेला असेच काही छान छान संकल्प आपण करू शकतो. हे संकल्प किती तडीस जातील हे माहीत नाही, पण आपण यानिमित्ताने आयुष्याकडे नव्याने पाहू या. नव्या उमेदीने पुढे जाऊ या. ही उमेद फक्त त्या दिवसाची नसते, तर दिवाळीनंतर बराच काळ टिकून असते. म्हणूनच दिवाळीची मजा काही वेगळीच असते.