जवानांसोबत साजरी केली दिवाळी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीमेवर तैनात जवानांच्या भेटीसाठी आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर आहेत. नौशेरामध्ये तैनात असलेल्या जवानांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. ‘आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून येथे आलो आहोत’, असे मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेल्या जवानांच्या शौर्याचे कौतुक केले. ‘नौशेराने प्रत्येक युद्धाचे, प्रत्येक कट-कारस्थानाचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वातंत्र्यानंतर शत्रूंनी या भागावर नजर ठेवली आहे. पण मला आनंद आहे की, नौशेराच्या वीरांच्या शौर्यासमोर सर्व कारस्थाने अपयशी ठरली आहेत. भारतीय सैन्याची ताकद काय असते, याचा अंदाज शत्रूला सुरुवातीच्या दिवसांमध्येच आला होता’, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
‘प्रत्येकाला वाटते की, आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी. मलाही वाटते की, मी दिवाळी माझ्या कुटुंबासोबत साजरी करावी. म्हणूनच मी इथे दिवाळी साजरी करतो. कारण तुम्ही माझे कुटुंबीय आहात. मी इथे पंतप्रधान म्हणून आलेलो नाही. मी तुमच्या परिवारातील एक सदस्य म्हणून आलो आहे’, असे मोदी म्हणाले. सैनिकांना त्यांनी स्वत:च्या हाताने मिठाई खाऊ घातली. ‘येथे मी एकटा आलेलो नाही. माझ्यासोबत १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणले आहेत. आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरिक दिवाळीनिमित्ताने एक दिवा तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभकामना देईल’, असेही मोदी यावेळी म्हणाले.
सर्जिकल स्ट्राइकला उजाळा…
नौशेरामध्ये जवानांशी बोलताना पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आठवणी जागवल्या. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. यावेळी नौशेराच्या जवानांनी गाजवलेल्या मर्दुमकीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ‘सर्जिकल स्ट्राइकमध्ये इथल्या ब्रिगेडने जी भूमिका निभावली, ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे’, असे ते म्हणाले. ‘सर्जिकल स्ट्राइकनंतर इथे अशांती निर्माण करण्याचे अनेक कुत्सित प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी इथे उत्तर दिले जाते. असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, यावेळी मोदींनी सर्जिकल स्ट्राइकच्या दिवशीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘तो दिवस कायम माझ्या लक्षात राहील. मी ठरवले होते की, सूर्यास्तापूर्वी सर्वजण परत यायला हवेत. मी प्रत्येक क्षणी फोन वाजण्याची वाट पाहत होतो. माझा शेवटचा जवान पोहोचला का हे पाहात होतो. आणि आपले कोणतेही नुकसान न होता आपले जवान यश मिळवून परत आले’, असे पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसवरही निशाणा!
‘दुर्दैवाने सैन्याच्या बाबतीत देशात हे मानले गेले होते की, आपल्याला जे काही मिळेल, ते विदेशातूनच मिळणार आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्याला झुकावे लागत होते. जास्त पैसे खर्च करावे लागत होते. नवी शस्त्रास्त्रे खरेदी करण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू असायची. एक अधिकारी प्रक्रिया सुरू करायचा, पण तो निवृत्त होईपर्यंत ती पूर्णच होत नव्हती. परिणामी जेव्हा गरज पडायची, तेव्हा शस्त्रास्त्रे घाईगडबडीत खरेदी होत होती. अगदी सुट्या भागांसाठीही आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून असायचो. पण आता संरक्षण क्षेत्रातल्या स्वावलंबनाचा संकल्प त्या परिस्थितीवर मात करण्याचा मार्ग आहे. देशाच्या उत्पन्नाचा ६५ टक्के हिस्सा देशांतर्गत उत्पादित गोष्टींवर खर्च होतो आहे’, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर देखील अप्रत्यक्ष शब्दांमध्ये निशाणा साधला.
एक जग, एक सूर्य, एक मोदी……
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ग्लासगो येथील जागतिक परिषदेत ‘एक जग, एक सूर्य, वन ग्रिड’ या संकल्पनेबद्दल मत मांडले होते. सर्व काही सूर्यापासून बनलेले आहे यावर भर देऊन ते म्हणाले की, जगाने एकाच ग्रीडच्या धोरणावर काम केले पाहिजे, जेणेकरून सौर ऊर्जेची व्यावहारिकता वाढू शकेल. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो लवकरच जगाला याबाबत कॅल्क्युलेटर उपलब्ध करून देईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. मोदी यांच्या घोषणेचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वागत केले आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात “एक जग, एक सूर्य, वन ग्रिड, एक नरेंद्र मोदी” असा उल्लेख केला. याचाच एक व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. ग्लासगो येथील जागतिक परिषदेत सोमवारी मोदी यांनी भारताची भूमिका मांडताना ही घोषणा केली असून भारतातर्फे तसे प्रथमच जाहीर करण्यात आले आहे.