Friday, December 13, 2024
Homeक्रीडाऑगस्टमध्ये दिवाळी साजरी

ऑगस्टमध्ये दिवाळी साजरी

सुनील सकपाळ

पंचांगाप्रमाणे देशभरात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होत आहे. मात्र आपल्या क्रीडा जगतात जुलै-ऑगस्ट महिन्यातच टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक पदकांच्या रूपाने फटाके फुटले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू असलेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये अद्याप अपेक्षित सेलिब्रेशन पाहायला मिळालेले नाही. मात्र खराब सुरुवातीनंतर भारताने जेतेपद पटकावण्याची करामत साधली, तर दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.

दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. दिवे अंधार दूर करून सर्वत्र प्रकाश पसरवतात. आपल्या प्रत्येकाचे आयुष्य असेच असायला हवे. वैयक्तिक आयुष्य जगताना आपापले काम चोखपणे बजावताना आपल्या कुटुंबाचा, प्रांताचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक कसा उंचावेल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असावे. आपल्या देशात भारतात सेलेब्रिटी (विशेष करून सिनेमा जगत) आणि स्पोर्ट्सपर्सन (क्रीडापटू) यांना विशेष महत्त्व दिले जाते. कायम प्रकाशझोतात (लाइमलाइट) असलेल्या खेळाडूंना युवा पिढी आदर्श मानते. त्यांच्या पावलावर पावले ठेवताना (फॉलो करताना) स्वत:ची वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करते. भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने यंदाचे वर्ष (२०२१) संस्मरणीय ठरले. कोरोना साथीचा फटका जगभराला बसला. त्यातून क्रीडा क्षेत्रही सुटले नाही. २०२० टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली. विषाणूचा प्रादूर्भाव कायम असल्याने स्पर्धेवर अनिश्चतेतेचे सावट होते. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना आणि जपान सरकारने मोठ्या हिंमतीने यशस्वी आयोजन केले. त्यामुळे जपानच्या राजधानीत यंदा ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत झाली.

दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेकडे अवघ्या जगभरातील क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेले असते. टोक्योमध्ये झालेल्या ३२व्या ऑलिम्पिक २०२० मध्ये २०६ देशांचे ११,६५६ क्रीडापटू सहभागी झाले होते. यात ३३ खेळांच्या ५० प्रकारात ३३९ स्पर्धा झाल्या. यात ३४० सुवर्ण, ३३८ रौप्य आणि ४०२ अशा एकूण १०८० पदकांची लयलूट झाली. पदके लुटण्यात अमेरिकेने चीनला मागे टाकून नंबर वनचा मान मिळवला. अमेरिकन अॅथलीट्सनी ३९ सुवर्णांसह ४१ रौप्य आणि ३३ कांस्य जिंकताना एकूण पदकांची संख्या ११३वर नेली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकांचे शतक ठोकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. अमेरिका आणि दुसऱ्या आणि चीनच्या (३८ सुवर्णांसह ८८ पदके) एकूण पदकांमध्ये २५ पदकांचा फरक असला, तरी अमेरिकेने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा केवळ एक जादा सुवर्णपदक जिंकले आहे. अव्वल पाच संघांमध्ये जपान (२७ सुवर्णांसह ५८ पदके), ग्रेट ब्रिटन (२२ सुवर्णांसह ६५ पदके) आणि दक्षिण कोरियाने (२० सुवर्णांसह ७१ पदके) स्थान राखले. मात्र आशिया खंडात झालेल्या स्पर्धेला भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच सुवर्णपदक आणि तेही वैयक्तिक प्रकारात मिळाले. ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी नीरज चोप्राने पुरुष भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला. भारताने त्याच्या सुवर्णासह दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण यंदा सात पदकांची कमाई केली. २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ६ पदके जिंकली होती. जपानमध्ये हा विक्रम मागे टाकला. भालाफेकपटू नीरज चोप्रामुळे भारताला ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच सुवर्णदिन पाहायला मिळाला. त्याने पहिल्या फेकीत ८७.०३ मीटर, दुसऱ्या फेकीत ८७.५८ मीटर, तिसऱ्या फेकीत ७६.७९ मीटर अशी कामगिरी नोंदवली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. दुसरा थ्रो ऐतिहासिक ठरला. सुवर्ण पदक मिळवून त्याने ऑलिम्पिक स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. नीरजनंतर वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवी दहियाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यंदा टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळवून दिले. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये करनाम मल्लेश्वरीने कांस्यपदक मिळवले होते. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या कांस्यपदकांच्या चौकारात बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची कामगिरी लक्षणीय ठरली. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये फायनल प्रवेश करता आला नाही तरी कांस्यपदक जिंकून तिनेही इतिहासात नोंद केली. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ६९ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली. स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक मिळवले.

मध्यंतरीच्या कालावधीत महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने जूनमध्ये झालेल्या पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या ख्रिस्तियाना बेरेझाला धूळ चारताना भारताचा तिरंगा फडकावला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात मॅटेओ पोलिसॉन स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. नेमबाजांनी ऑलिम्पिकमध्ये निराशा केली, त्यानंतरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार खेळ केला आहे. मात्र ऑलिम्पिक खेळानंतर क्रिकेटची हवा आहे. गेल्या दोन दशकांत या खेळाने जनमानसांवर गारूड केले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आता टी-ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकप खेळला जात आहे. हा वर्ल्डकप गेल्या वर्षी भारतात होणार होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने तो होऊ शकला नाही. शेवटी यंदा आयपीएलनंतर यूएईतच वर्ल्डकप खेळला जात आहे. बीसीसीआयच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये यजमान भारताचा संघ प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ यूएईत दिवाळी साजरी करेल, असे वाटले होते. मात्र ते परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरले. अननुभवी अफगाणिस्तानविरुद्ध थोडे फार फटाके फुटले तरी माजी विजेते उपांत्य फेरी गाठतील, असे कुणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. भारताने खेळ उंचावताना पुन्हा जेतेपद पटकावले, तर देव दिवाळीत का होईना, मोठे सेलिब्रेशन होईल. क्रिकेटपटू काय दिवे लावतात, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र जुलै-ऑगस्टमध्येच भारताच्या क्रीडा जगताची खरी दिवाळी साजरी झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -