Saturday, March 22, 2025
Homeदेशलसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी धर्मगुरूंची मदत घ्या

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी धर्मगुरूंची मदत घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन; लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी स्थानिक धर्मगुरूंची मदत घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर मोदी यांनी बुधवारी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यामध्ये ४० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आढावा बैठकीत उपस्थित होते.

१०० वर्षांतील या सर्वात मोठ्या महामारीविरुद्धच्या लढ्यात एक खास गोष्ट म्हणजे आपण नवीन उपाय शोधले, नवनवीन मार्गांचा उपयोग केला. तुमच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन नावीन्यपूर्ण मार्गांवर अधिक काम करावे लागेल. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक शहरासाठी वेगळी रणनीती बनवायची असेल, तर तीही बनवा.

तुम्ही प्रदेशानुसार २०-२५ लोकांची टीम तयार करून देखील हे करू शकता. लोकांमध्ये अफवा आणि गोंधळ हे एक आव्हान आहे. यासाठी एक मोठा उपाय म्हणजे लोकांना अधिकाधिक जागरूक करणे. यामध्ये तुम्ही स्थानिक धर्मगुरूंची देखील मदत घेऊ शकता. काही दिवसांपूर्वी मी पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली होती. लसीबाबत धर्मगुरूंचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यावरही आपल्याला विशेष भर द्यावा लागेल, असे मोदी म्हणाले.

१०० कोटी डोस झाले तरी हलगर्जीपणा नको

“लसीकरणात आतापर्यंत झालेली प्रगती ही तुमच्या मेहनतीमुळे आहे. प्रशासनातील प्रत्येक सदस्य आणि ‘आशा’ कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी पायी चालत दुर्गम ठिकाणी लसीकरण केले. पण १०० कोटी डोस झाले असले तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिला. देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आजवर भारतात १०७ कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -