संतोष वायंगणकर
बई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. अखंड कोकणातून जाणारा आणि गोवा राज्य जोडणारा हा महामार्ग म्हणजे कोकणच्या विकासाचा हा राजमार्ग म्हणावा लागेल. कोकणातील या महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात या महामार्गाचे काम जैसे थे आहे. या मुंबई-गोवा महामार्गाला सुरुवात झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील महामार्ग अर्धवट स्थितीत आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे फारच दिव्य मानले जाते.
कोकणातून जाणाऱ्या या महामार्गाच्या पूर्ततेसाठी अनेकांनी आंदोलने, उपोषणे केली आहेत. या महामार्गासाठी कोकणातील विशेषत: रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. रास्ता रोको, उपोषण अशी आंदोलने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी केली आहेत. या आंदोलनामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, या महामार्गावर आजवर दोन हजारांवर अपघात झाले असून ८००च्या वर लोकांचे बळी गेले आहेत. अर्धवट राहिलेल्या महामार्गाच्या कामामुळेही अपघात आणि बळींची संख्या वाढली आहे. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात आणि बळी गेल्यावर शासनकर्त्यांना त्याचे गांभीर्य असायला हवे होते; परंतु शासनाच्या लालफितीत वनजमीन आणि भू-संपादन यात हा महामार्ग अडकला होता. केंद्रामध्ये रस्ते वाहतूक व भूपृष्ठ मंत्रालयाचा कारभार नितीन गडकरी यांनी स्वीकारला आणि कोकणातील या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न काहीसा पुढे सरकला. मुंबईच्या जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातच या प्रकल्पाचे काम थांबले होते. गेली दहा वर्षे दर गणेशोत्सवात तात्पुरती खडी टाकून मुंबईकर कोकणवासीय चाकरमानी कसा तरी प्रवास करायचा. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने बहुतांशी वाहनधारक कोकणात यायचे झाल्यास मुंबई-पुणे-कोकण असा प्रवास करतात.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणारे भले मोठे लांबलचक खड्डे यामुळे या महामार्गावरून प्रवास नकोसा होत असतो. या महामार्गावरून यायचे झाले, तर १२ ते १४ तास लागतात. आजही पोलादपूरजवळ या महामार्गाचे काम सुरू असल्याने कोकणात यायला फार वेळ लागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या बाबतीत कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दीड वर्षांत या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे सूतोवाच केले आहे. हा महामार्ग तब्बल एक-दोन नव्हे, तर १५ वर्षे रखडला होता. न्यायालय, वनजमीन, भू-संपादन अशा विविध प्रश्न, समस्यांमध्ये हा महामार्ग रखडलेला होता. मधल्या काळामध्ये अनेक ठेकेदार कंपन्यांनी काम घेतले आणि काम अर्धवट टाकले; परंतु अलीकडेच मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेली काही वर्षे रखडलेला रस्ता पूर्ण झाला पाहिजे, यासाठी दिल्लीत बैठका घेऊन त्यावर तोडगा काढण्यात आला. ज्या ठेकेदार कंपन्यांकडून अडवणूक करून हे काम रखडवण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर उपाययोजना करून या कामाला गती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. इंदापूर ते वाकणफाटा या रस्त्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहेत. खेड ते लांजा या रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाचे काम झालेले नाही. १३० किलो मीटरचा हा महामार्ग पूर्णत: ठप्प आहे. लांजा ते सावंतवाडीपर्यंतचे महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. १५-२० टक्के इतकेच काम पूर्ण व्हायचे आहे. उर्वरित काम पूर्ण झाले आहे. पुढील दीड वर्षांत या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्नाटक आणि गोवा राज्य कोकणातून जाणाऱ्या या महामार्गाने जोडले जाणार आहेत. मुंबई ते गोवा या प्रवासासाठी विमान, रेल्वे हे दोन्ही दळणवळणाचे पर्याय असले तरीही मुंबईतून कोकणात मुंबई-गोवा महामार्गावरच्या प्रवासाचा एक वेगळाच आनंद घेता येतो आणि आता तर चौपदरीकरणाने तयार होत असलेल्या या महामार्गावरील प्रवासाचा एक वेगळाच आनंद असणार आहे.
मुंबई-गोवा या महामार्गाचे काम पूर्ण होत असतानाच कोकणातील किनारपट्टीवरील सागरी महामार्गाचे कामही प्रस्तावित आहे. दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना मुंबई ते रेडी असा कोकणच्या किनारपट्टीवरून सागरी महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील भाऊच्या धक्कावरून सुटणारी बोट वाहतूक बंद झाल्यानंतर कोकणातील किनारपट्टीवरील बंदरे ओस पडली होती. कोकणातील किनारपट्टीच्या बाजारपेठांमधूनही अवकळा आली होती. व्यापार, व्यवसाय सारेच थांबले होते. कोकणच्या किनारपट्टीच्या व्यापारीपेठांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस यावेत, यासाठी हा कोकणातील सागरी महामार्ग उपयुक्त ठरणार होता; परंतु बॅ. अंतुले यांनी या कामाचा शुभारंभ केला; परंतु त्यानंतर या सागरी महामार्गाला फार गती प्राप्त झाली नाही. अलीकडे तर उच्च न्यायालयाने कोकणातील राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्याशिवाय कोकणातील अन्य कोणत्याही महामार्गाचे काम हाती घेऊ नये, असे आदेशच राज्य सरकारला दिले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर कोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीनुसार कोकणातून गोव्याकडे जाणारा हा महामार्ग निश्चितच लवकरच पूर्ण होऊन निसर्गसंपन्न कोकणातून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आनंद घेता येईल.