Friday, July 11, 2025

आ. नितेश राणेंचे पालिका आयुक्तांना पत्र

आ. नितेश राणेंचे पालिका आयुक्तांना पत्र

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या ढिसाळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी




मुंबई (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानाच्या गेल्या ३० वर्षांच्या लेखा विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत, कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि भविष्याबाबत तसेच प्रतिष्ठानच्या खाजगीकरण करण्याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिले आहे.


बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानाच्या दोन्ही संकुलाची संकल्पना आणि अंधेरी संकुलाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने मागील तीस वर्षांच्या कराराद्वारे बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठनास अंधेरी व मुलुंड येथील दोन्ही वास्तू चालविण्याकरिता दिल्या असल्या तरी मोठया दुरुस्तीची सर्व कामे महानगपालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे केली जात होती. परंतु, २०१६ पासून मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षी करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतुदी काही कारणास्तव स्थगित ठेवण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले आहे.


बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानमधील दोन्ही संकुलातील विविध क्रीडा सुविधांचे खाजगीकरण न करता या सुविधा प्रतिष्ठानामार्फत एक चांगले ध्येयधोरण ठरवून चालविणे तसेच बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानातील दोन्ही क्रीडा संकुलातील आवश्यक त्या विभागांच्या दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता पूर्वीप्रमाणे महानगरपालिकेच्या आर्थिक संकल्पात तरतूद करून त्याबाबत पूर्तता करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा