Wednesday, July 3, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखईशान्य भारतात भाजपची सरशी

ईशान्य भारतात भाजपची सरशी

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने देशातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योगपती, नोकरदार आदी सर्वच वर्गातील घटकांकडे लक्ष पुरवून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याकडे पुरेपूर लक्ष दिल्याने हे सर्व घटक सतत पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. मोदी सत्तेवर आल्यापासून जेव्हा जेव्हा निवडणुका, पोटनिवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचाच म्हणजे मोदींच्याच नेतृत्वाचा विजय झालेला दिसला. म्हणजेच देशापुढे मोदींच्या कणखर, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाशिवाय आणि भाजपशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय सध्या तरी नाही, असाच मथितार्थ काढला, तर तो वावगा ठरणार नाही. देशातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रासह १३ राज्यांतील २९ विधानसभा जागांवर शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी मंगळवार २ नोव्हेंबर रोजी झाली. त्यानुसार भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण १५ जागांवर म्हणजे २९ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे ईशान्य भारतातील राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची सरशी झालेली दिसत आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने पाचही जागांवरील पोटनिवडणूक जिंकली आहे. मध्य प्रदेशात भाजपने तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघ आणि खांडवा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. बिहारमध्ये, जनता दल युनायटेडने तारापूर आणि कुशेश्वर अस्थान या दोन्ही जागा जिंकल्या. कर्नाटकमध्ये भाजपने सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे, तर हंगल मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्व चार जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे विधानसभेच्या एकूण २९ जागांपैकी काँग्रेसला केवळ आठ जागांवर आपला झेंडा रोवता आला आहे. तरी सर्वात जुन्या पक्षाचे नेते आणि काही कार्यकर्ते या विजयाने हुरळून गेले आहेत.

या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण यापुढे काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून या निवडणूक निकालांच्या माध्यमातून जनतेचा कौल जोखण्यास मदत होणार असल्याने राजकीय जाणकारांचे त्याकडे बारीक लक्ष होते. विधानसभेसोबतच लोकसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणूक झाली. यामध्ये दादरा आणि नगर हवेलीची जागा शिवसेनेने जिंकली तर हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. मध्य प्रदेशातील खांडवा येथील जागेवर भाजपने आपला झेंडा फडकवला. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर (राखीव) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे ४० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. दादरा – नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले सेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. डेलकर यांच्या खासदार पतीने मुंबईत आत्महत्या केल्याने ही पोटनिवडणूक झाली व या निवडणुकीत सेनेला सहानुतीच्या लाटेचा फायदा मिळाला असेच म्हणावे लागेल. एकूणच या पोटनिवडणुकीत देशातील वाढत्या महागाईच्या मुद्दयाचा थोडाबहुत फटका भाजपला बसला असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे भाजप नेतृत्व महागाईसारख्या मुद्दयाकडे विशेष लक्ष देईल असे दिसते.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कटिबद्ध असल्याने यापुढील बहुतेक सर्वच निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा निश्चित आहे. पण थोडी सावधगिरी ही बाळगावीच लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -