Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर सहज विजय

ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर सहज विजय

६.१ षटकांत गाठले लक्ष्य

दुबई (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने गुरुवारी बांगलादेशवर सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं नेट रनरेटमध्ये बरीच सुधारणा करताना ग्रुप १ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अवघ्या ६.१ षटकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचा डाव १५ षटकांत ७३ धावांवर आटोपला. अॅडम झम्पाने १९ धावांत ५ विकेट्स घेत टी-२०तील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशची ही दुसरी नीचांकी खेळी ठरली. यापूर्वी २०१६मध्ये न्यूझीलंडने त्यांना ७० धावांत गुंडाळले होते. गुरुवारच्या सामन्यात मिचेल स्टार्क (२-२१) व जोश हेझलवूड (२-८) यांनी प्रत्येकी दोन, तर ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. बांगलादेशचा मोहम्मद नईम (१७), शमीम होसैन (१९) व महमुदुल्लाह (१६) यांनाच दुहेरी धावसंख्या करता आली.

इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठा धक्का बसला होता आणि त्यात दक्षिण आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवून सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला नेट रनरेटमध्ये आफ्रिकेला मागे टाकण्यासाठी हा सामना ८ षटकांत जिंकणे गरजेचे होते. सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी तो मिळवला.

अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी त्या दृष्टीनं खेळ केला. फिंचने २० चेंडूंत २ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचून ४० धावा केल्या. त्याने वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या. वॉर्नर १४ चेंडूंत ३ चौकारांसह १८ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने ६.१ षटकांत २ बाद ७८ धावा करताना ग्रुप १मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. हा ऑस्ट्रेलियाचा टी-२०तील षटकांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २००७मध्ये त्यांनी श्रीलंकेवर १०.२ षटकांत विजय मिळवला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाचे ६ गुण व १.०३१ नेट रनरेट झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -