मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका वेगाने लसीकरण करत असली तरी मुंबईतील तब्बल तीन लाख जणांनी मुदत संपून गेली तरी दुसरा डोस घेतलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेकडून सर्व २४ वॉर्डमध्ये लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
दुसरा डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी वॉर्ड ऑफिसमध्ये पाठवण्यात आली असून पालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अशा नागरिकांचा शोध घेत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी २८ दिवसांची मुदत होती, मात्र काही दिवसांनंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही मुदत ८४ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, दुसरा डोस घेण्यास अनेकजण हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पालिका लसीकरण मोहीम राबवते आहे; तर दुसरीकडे लोकांच्या हलगर्जीपणाचा फटका लसीकरण मोहिमेला बसत आहे. दरम्यान, दुसऱ्या डोसची मुदत संपून गेलेल्यांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.