प्रियानी पाटील
अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करताना लक्षदिव्यांचे तेज घेऊन येणारी दिवाळी साऱ्यांचेच आयुष्य उजळवून टाकणारी ठरते. दारी तोरण, अंगणी रांगोळी, कंदिलाचे आकर्षण, दिव्यांची रोषणाई आणि पणत्या, दिव्यांचे चहुकडे पसरलेल्या तेजाने आसमंत उजळून निघतो. दिवे तेलाचे असोत किंवा मेणाचे, पणती असो किंवा कारेट्याचे त्यातून उजळणारे तेज हे दिवाळी सणाचे महत्त्व वाढवणारे ठरते.
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशीचा दिवस अर्थातच दीपावलीचा दिवस म्हणून महत्त्वाचा आहे. अभ्यंगस्नानाचे महत्त्व असलेला दिवस पहाटेला उटण्याच्या सुगंधाने दरवळून उठतो.
दारी रांगोळ्या, तोरणे, दिव्यांची रोषणाई करून देवपूजा, फराळाचा नैवेद्य आणि आपल्या नातेवाईक, मित्र, स्नेहींना जोडणारा हा दुवा म्हणजे दिवाळीचा सण असतो. सारी दु:ख क्षणभर विसरून आनंद, उत्साहाने झगमगणारा हा दिवस परंपरा जपणारा ठरतो. आख्यायिकेनुसार कृष्णाने नरकासुराच्या देहाचे तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुराच्या वधाने देवादिकांना, प्रजेला आनंद झाला.
कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. अहंकाराचे उच्चाटन होऊन, लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी लक्षदिव्यांची आरास या दिवशी केली जाते.
दिवाळीची पहाट ही अभ्यंगस्नानाची पहाट म्हणून ओळखली जाते. सुगंधी उटण्याचे स्नान हे सूर्योदयापूर्वी केले जाते. स्नानानंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून कारेटी फोडून अहंकार, पाप, वाईट गोष्टींचा नाश होऊन लक्षदिव्यांच्या तेजाने आपले आयुष्य उजळावे, हा हेतू ठेवून दिवाळी साजरी केली जाते. अर्थातच या दिवशी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आप्तजनांशी सलोखा राखला जातो. स्नेहमयी ठरणारा हा दिवस गोड-धोड फराळासोबतच चिवडा-लाडूच्या खमंग आस्वादाने अधिकच रुचकर बनून जातो. या सणाला दिवाळीची पहाट, फटाक्यांची आतिषबाजी आणि लहान-थोरांचा उत्साह हा अवर्णणीय आिण वाखाणण्याजोगा असतो.
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजनाचा दिवस हा दिवाळीतील सायंकाळ तेजोमय करणारा ठरतो. सायंकाळच्या वेळी दिव्यांच्या आराशीने, तेजोमय दीप अंगण खुलवणारे ठरतात. कंदिलाच्या प्रकाशात घर न्हाऊन निघते. लक्ष्मीपूजनाने दिवाळीचा दिवस सार्थकी ठरतो. प्रसन्न आणि पावित्र्याची आरास मनाला आल्हाद देणारी असते. या दिवशी विशेषत: गृहिणी नवीन झाडू, केरसुणी आणून तिची लक्ष्मीचे रूप म्हणून पूजा करतात. पैसे, दागिने, जे काही धन असेल त्याची पूजा यावेळी केली जाते. रांगोळीची आरास आणि पाटावर साकारलेले लक्ष्मीचे रूप घरातील पावित्र्य राखते. हा दिवस केवळ घरातच नाही, तर व्यापारी वर्ग, दुकाने, आॅफिस आदी ठिकाणी लक्ष्मीपूजनाने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भाऊबीज
भाऊबीज हा दिवस यम द्वितीया या नावानेही ओळखला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमीच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी बंधुप्रेमाचा दिवस म्हणून भाऊबिजेचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भावास ओवाळले जाते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणी प्रार्थना करतात. ओवाळणी म्हणून हक्काने भावाने दिलेली ओवाळणी बहिणींसाठी खास आिण लाख मोलाची ठरते. नात्यांचा सन्मान, आप्तांचा आदर, स्नेहमय वातावरण, गोड-धोडाची मेजवानी, फराळाचा आस्वाद, परंपरा, आख्यायिकांनुसार जतन केलेले रितीरिवाज पाहता दिवाळीचा सण हा साऱ्यांच्याच आयुष्यात लाखमोलाचा ठरत आहे. परंपरेचा स्रोत जपताना रांगोळी, फराळ, आकाशकंदील, नव्याने होणारी खरेदी आणि फटाक्यांची आतषबाजी ही लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचाच आनंद द्विगुणित करणारी ठरते, हे मात्र नक्की. जवळपास चार ते पाच दिवस अगोदरपासूनच दिवाळीचा आनंद परंपरेनुसार साजरा केला जातो. संदेशांच्या आिण शुभेच्छांच्या माध्यमातून या दिवाळीचा आनंद अधिकच द्विगुिणत होऊन जातो.
तुळसी विवाह
दिवाळीनंतर तुळसी विवाहाचा दिवस हा अगदी परंपरेचा हिस्साच अाहे. पंढरपूरला हा सोहळा नेत्रदीपक ठरतोच, शिवाय प्रत्येक घराघरांत हा सोहळा आनंदाने साजरा केला जातो. यासाठी ऊस, केळीचे पान, सुपारी, छोटे हार, अंतरपाट, अक्षता ते अगदी मंगलाष्टकापर्यंतची तयारी करण्यात घरातील सर्वजण तल्लीन होऊन गेलेले दिसतात, तर लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. सायंकाळच्या वेळेस अंगणात पार पडणारा तुलसी विवाह मंगलाष्टकांनी दुमदुमून जातो. परंपरेचं अनोखं रूप यावेळी पाहण्यास मिळतं. दिवाळी सणाचा उत्साह एक नव्हे, तर वसुबारसपासून तुळसी विवाहापर्यंत लहान-थोरांपर्यंत टिकून राहतो. तो अगदी पुढील दिवाळी येईपर्यंत आठवणींच्या रूपाने तसाच टिकूनही राहणारा ठरतो.