Sunday, August 31, 2025

क्लीनअप मार्शलकडून लोकांना त्रास सुरूच

क्लीनअप मार्शलकडून लोकांना त्रास सुरूच

मुंबई (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीत क्लीनअप मार्शलची दादागिरी सुरू असल्याची तक्रार मुंबईकर करत आहेत. मुंबईत दिवाळीनिमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे; मात्र या गर्दीत कोरोना नियम मोडू नये यासाठी क्लीनअप मार्शल मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत. मात्र या क्लीनअप मार्शल सोबत मुंबईकरांचे वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिवाळीनिमित्त मुंबईतील दादर, मस्जिदबंदर, कॉफर्ड मार्केट या सगळ्याच बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र या गर्दीत मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शल तैनात असल्याचे दिसत आहेत. मात्र या क्लीनअप मार्शलची दादागिरी सुरू असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. जर एखाद्या व्यक्तीने काही सेकंदासाठी देखील मास्क खाली केला असेल तरी त्या नागरीकाकडून दंड आकारला जात असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्यासोबत वाद करताना केवळ एक नाही तर सगळेच क्लीनअप मार्शल घोळक्याने जमा होत असून वाद घालत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

क्रॉफर्ड मार्केट परिसरात देखील एकाच ठिकाणी क्लीनअप मार्शल घोळक्याने उभे आहेत. केवळ सामान्य नागरिकांवर कारवाई करत वाद घालत आहेत. मात्र तिथेच विना मास्क उभ्या असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याचे पाहायला मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान क्लीन अप मार्शलसोबतचे वाद वाढतच असल्याचे दिसते.

Comments
Add Comment