महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केली. देशमुख यांना शंभर कोटी वसुलीच्या आरोप प्रकरणी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्याच्या गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसुलीचे आरोप होणे, हे देशात प्रथमच घडले होते. अशा खंडणी वसुली प्रकरणी गृहमंत्र्याला राजीनामा देणे भाग पडले, असेही देशात प्रथमच घडले आणि ईडीकडून राज्याच्या (पदावर नसलेल्या) गृहमंत्र्याला अटक होणे, हेही प्रथमच देशात घडले. महाविकास आघाडी सरकारची ही दोन वर्षांची कामगिरी आहे. खरे तर, देशव्यापी विक्रमात ठाकरे सरकारची नोंद होईल. ज्याला दरमहा मुंबईतील डान्सबार आणि हॉटेलवाल्यांकडून शंभर कोटी वसूल करायला सांगितले, तो तुरुंगात आहे, सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्याने या खंडणी वसुलीचा गौप्यस्फोट केला व थेट गृहमंत्र्यांवर आरोप केला, तो माजी पोलीस आयुक्त गेले कित्येक महिने बेपत्ता आहे आणि ज्याच्यावर आरोप झाले तो (माजी) गृहमंत्री ईडीच्या अटकेत आहे. अरे हे सरकार आहे की, गँगस्टरची टोळी?
अनिल देशमुख यांना आज ना उद्या अटक होणार व त्यांची रवानगी जेलमध्ये होणार, हे अटळ होते. ईडीने त्यांना बचावाची भरपूर संधी दिली. तब्बल पाच वेळा समन्स काढूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीला गेले नाहीत. त्यांना पुरावे गोळा करायला सुद्धा ईडीने भरपूर वेळ दिला. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूरमधील निवासस्थानी चौकशी यंत्रणेने पाच वेळा तरी छापे टाकले, एकाच माणसाच्या घरावर किती वेळा छापे टाकायचे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे विचारला होता. पण त्यातून ईडीच्या अटकेचा फास देशमुखांच्या गळ्याभोवती आवळला जात होता, हे कुणाच्या लक्षात आले नसावे.
अटकपूर्व जामीन कुठेच मिळत नाही, हे लक्षात आल्यावर देशमुखांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याचे ठरवले व सोमवारी सकाळीच ते मुंबईतील ईडीच्या कार्यालयात गेले. दिवसभर म्हणजे तब्बल तेरा तास त्यांची तेथे चौकशी चालू होती. सायंकाळी दिल्लीहून ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत आले, तेव्हाच देशमुख यांचे घरी परतण्याचे मार्ग बंद झाले. मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांना ईडीने अटक केली आणि ठाकरे सरकारला मोठी चपराक बसली.
देशमुख हे वयाने पंचाहत्तरीत आहेत. आपल्या वयाचे, प्रकृतीचे आणि कोरोनाचे कारण सांगून ईडीसमोर जाण्याचे टाळत होते. पण ईडीसमोर गेल्यावर ते चौकशीत सहकार्य करीत नाहीत, असे लक्षात आले, त्यामुळे त्यांना अटक करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीच्या झालेल्या आरोपाची ईडीने मनी लाँडरिंग दृष्टिकोनातून चौकशी सुरू केली होती. देशमुख यांची पत्नी व मुलगा यांचीही दोन वेळा चौकशी झाली. त्या दोघांना ईडीने पुन्हा चौकशीला बोलावले, तर आश्चर्य वाटायला नको. देशमुख ईडीसमोर हजर झाल्यावर सोशल मीडियावर त्याची एक पोस्ट व्हायरल झाली. त्यात त्यांनी म्हटले आहे – ज्या ज्या वेळी ईडीने समन्स जारी केले, तेव्हा माझी सहकार्याचीच भूमिका होती. आपल्या याचिका उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याचा निकाल लागल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, अशी भूमिका आपण वेळोवेळी मांडली. सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापे घातले तेव्हाही मी त्यांना पूर्ण सहकार्य केले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही, पण आपण स्वत:हून ईडी कार्यालयात गेलो.
अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांनी केलेले शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप फेटाळले आहेत. ते स्वत: विदेशात असल्याचे मला मीडियातून समजले. परमबीर सिंह यांच्याविरोधात काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. देशमुखांवर शंभर कोटींचा आरोप करणारा कोणी सोम्यागोम्या नव्हता. देशमुख गृहमंत्री असताना तो मुंबईचा पोलीस आयुक्त होता. मुंबई पोलीस आयुक्त हे पोलीस दलातील अतिशय शक्तिशाली पद आहे. उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, परमबीर सिंह हे सर्व अगोदर हातात हात घालून काम करीत होते. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, कंगना रणावत किंवा दिशा सॅलियन ही प्रकरणे हाताळताना सरकार व पोलीस आयुक्त यांच्यात एकवाक्यता होती. मग नंतर कधी, कोणामुळे कसे बिनसले? सचिन वाझेला अटक झाल्यानंतर सर्व बिंग फुटू लागले व त्यातून कोणाचे कसे आर्थिक लागेबांधे आहेत, हे केंद्रीय चौकशी यंत्रणेपुढे उघड होऊ लागल्याने ठाकरे सरकारमध्ये राज्यकर्ते विरुद्ध प्रशासन असे दुभाजन झाले. ज्या पोलिसांना वापरून ठाकरे सरकारने मनमानी कारभार चालू ठेवला होता, तोच आता चौकशीच्या भोवऱ्यात सापडला. शंभर कोटींच्या वसुलीची चौकशी ईडी व सीबीआय अशा दोन्ही सर्वोच्च केंद्रीय यंत्रणांकडून चालू आहे. त्यात देशमुख अडकले आहेतच, पण लवकरच आणखी काही बडी धेंडे अडकतील, अशी चिन्हे दिसत आहेत. अनिल देशमुख यांच्यानंतर पुढचा नंबर कोणाचा याची उघड चर्चा चालू आहे. देशमुखांच्या अटकेने ठाकरे सरकारमधील अनेकांची दिवाळी खराब झाली आहे. पण अनेक मंत्र्यांनी आपल्या घरावर व कार्यालयावर रोषणाई व सजावट करून सर्व काही छान आहे, असे भासवण्याचा प्रयत्न चालवला आहे. देशमुखांची अटक म्हणजे जसे करावे, तसे भरावे या उक्तीचे उदाहरण आहे.