दुबई (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सुपर-१२ फेरीतील (ग्रुप २) बुधवारच्या (३ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध न्यूझीलंडचे पारडे जड आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या अपयशी सलामीनंतर न्यूझीलंडने भारतावर मात करताना वेळीच पुनरागमन केले. किवींच्या खात्यात दोन सामन्यांनंतर दोन गुण आहेत. सेमीफायनलचे आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात स्कॉटलंडविरुद्ध करावी लागेल.
दोन सामन्यांनंतर किवींच्या एकाही बॅट्समनला अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. सर्वाधिक ४९ धावा डॅरिल मिचेलच्या आहेत. त्याने भारताविरुद्ध ही खेळी केली. कर्णधार केन विल्यमसनने थोडा प्रतिकार केला तरी डेवॉन कान्व्हे, मार्टिन गप्टिलला अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. गोलंदाजी तितकी प्रभावी नसली तरी लेगस्पिनर ईश सोढी तसेच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (दोन सामन्यांत प्रत्येकी चार विकेट) बऱ्यापैकी बॉलिंग करताना भारताविरुद्धच्या विजयात खारीचा वाटा उचलला आहे.
स्कॉटलंडकडून रिची बेरिंग्टनने एक अर्धशतक झळकावले आहे. क्रॉस आणि ग्रीव्हज यांनीही थोडा प्रतिकार केला आहे, मात्र गोलंदाजी तितकी प्रभावी ठरत नाही.
वेळ : दु. ३.३० वा.