Monday, July 1, 2024
Homeमहत्वाची बातमीभू-अलंकरण : रांगोळी

भू-अलंकरण : रांगोळी

आनंदाचा सण दिवाळी दिवाळी
रंगरंगांची उधळण
अशी ही रांगोळी रांगोळी…

आनंद, चैतन्य, उत्साह, जल्लोष, आतिषबाजी व रोषणाई यांचा मेळ घालणारा सण म्हणजे दिवाळी! आजूबाजूचा परिसर दिव्यांच्या आणि रोषणाईच्या प्रकाशात उजळून निघत असताना सर्वात जास्त लक्ष वेधून घेते, ती लक्ष्मीच्या स्वागतासाठी प्रत्येक दारासमोर घातलेली रंगांत रंगलेली आकर्षक रांगोळी!

रांगोळी म्हणजे भू-अलंकरण! जमिनीवर केलेले सुशोभन! संस्कृतमध्ये रांगोळीला रंगवल्ली म्हणतात, म्हणजे रंगांच्या रेखाटलेल्या ओळी! विविध साहित्यांचा वापर करून जमिनीवर काढलेली चित्रे, आकृत्या म्हणजे रांगोळी! रांगोळी म्हणजे बोटांच्या चिमटीतून, पांढरे शुभ्र चूर्ण जमिनीवर सोडून, त्यात आकर्षक रंग भरून चितारलेली नयनरम्य आकृती!

रांगोळी ही मांगल्याचे, पावित्र्याचे, प्रसन्नतेचं प्रतीक! ‘घराची कळा, अंगण सांगे’ या उक्तीप्रमाणे, घराच्या अंगणात सडासंमार्जन करून सारवलेल्या जमिनीवर घातलेल्या रांगोळीवरून त्या घराची शुद्धता, स्वच्छता, पवित्रता, ऐश्वर्य, समृद्धी आणि घरातील महालक्ष्मीचा वास प्रकट होतो. प्रत्येक स्त्री ही आपल्या उपजत गुणांनुसार रांगोळीत आपले कलाविष्कार साकारत असते. रांगोळी घालणारी स्त्री म्हणजे साक्षात महालक्ष्मी! रांगोळी घालताना तिच्यात अध्यात्मिक प्रसन्नता निर्माण होत असते.

रांगोळी ही चौसष्ट कलांपैकी एक. मूर्तिकला, चित्रकलेपेक्षाही प्राचीन. रांगोळीचा उल्लेख वेदांमध्ये आढळतो. आपल्या भारतीय संस्कृतीत तसेच पारशी धर्मातही रांगोळी शुभसूचक मानली जाते. रांगोळीला ‘अल्पना’ असेही म्हणतात. अल्पना म्हणजे आलेपन-लेप करणे. प्राचीन काळी असा विश्वास होता की, कलात्मक चित्रे घरात काढली की घर, धनधान्य सुरक्षित राहते. रांगोळी ही केवळ सजावटीची गोष्ट नसून, रांगोळीतून येणाऱ्या सात्त्विक लहरींनी सकारात्मक वातावरण तयार होत असते. अंगणात, उंबरठ्यावर, देवघरात, तुळशी वृंदावनासमोर रोज रांगोळ्या घातल्या जातात. तसेच लग्नसमारंभ, सण-उत्सव, कुळाचार प्रसंगी मोठमोठ्या रांगोळ्या घातल्या जातात.

रांगोळी ही आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान प्रकारात घातली जाते. आकृतीप्रधान रांगोळीमध्ये भौमितिक आकृत्या काढल्या जातात, तर वल्लरीप्रधानमध्ये पाने, फुले, कुंदन इ. चा वापर केला जातो.

महाराष्ट्रात ठिपक्यांची रांगोळी या पारंपरिक प्रकारासोबतच आता संस्कार भारतीचीही रांगोळी खूप प्रसिद्ध आहे. चाळणीच्या सहाय्याने रंग भरून, त्यावर पाच बोटांच्या सहाय्याने सफेद रांगोळीने आकृत्या काढल्या जातात. पाण्यावरची रांगोळी हा अजून एक लक्षवेधक प्रकार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फुलांची रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. ताटाभोवती फुलांची महिरप काढली जाते. पोर्टेट रांगोळीत प्रसिद्ध व्यक्तींची अगदी हुबेहूब रांगोळीचित्रे साकारली जातात. ताटाभोवती, उंबरठ्यावर, यज्ञाच्या वेदीभोवती बॉर्डर रांगोळी घातली जाते. फेव्हीकॉलमध्ये रंग मिसळून तसेच तेलाच्या रंगाने दारात कायमस्वरूपी रांगोळी घालता येते.

इतर कलांच्या तुलनेत रांगोळी ही लोककला काळाप्रमाणे बदलत अजुन समृद्ध होत आहे. घरच्या दारातली रांगोळी आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.

हा रांगोळीचा महिमा पूर्वापार चालत आलेला आहे. असे हे…

रांगोळीच्या कलेचे वैभव,
असेच सर्वत्र जगभर पसरावे…
हिंदू संस्कृतीच्या पताकेने,
चहू दिशांत उंच उंच फडकावे…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -