Monday, July 1, 2024
Homeक्रीडातुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात

तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात

कपिल देव यांनी विराटला फटकारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ढेपाळलेल्या सांघिक कामगिरीवर जाहीर भाष्य करणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीला माजी महान अष्टपैलू कपिल देव यांनी फटकारले आहे. आम्ही पुरेसे धैर्य दाखवू शकलो नाही, असे त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर म्हटले होते.

कोहलीचे विधान कपिल देव यांना पटलेले नाही आणि कर्णधाराने अशी विधाने टाळावीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूसाठी हे अत्यंत कमकुवत विधान आहे. संघाची देहबोली अशी असेल आणि कर्णधाराची अशी विचारसरणी असेल तर संघाला वर नेणे खरोखर कठीण आहे. त्याचे बोलणे ऐकून मला थोडे विचित्र वाटले. तो तसा खेळाडू नाही. तो एक सेनानी आहे. मला वाटते की, आम्ही पुरेसे धैर्य दाखवले नाही किंवा आम्ही पुरेसे धाडस दाखवत नव्हतो असे कर्णधाराने बोलू नये. तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात आणि त्यांना आवड आहे. पण अशी वक्तव्ये केली तर नक्कीच लोक तुमच्याकडे बोट दाखवतील, असे कपिल देव म्हणाले.

मला वाटत नाही की आम्ही आमच्या खेळात बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये धैर्य दाखवू शकलो नाही. आम्ही मैदानात उतरलो तेव्हा आमच्या बॉडी लँग्वेजमध्ये फारसे धैर्य नव्हते आणि न्यूझीलंडची देहबोली चांगली होती. आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही विकेट गमावल्या. अनेकदा असे घडते जेव्हा तुम्हाला शंका असते की तुम्ही शॉट खेळावा की नाही. तुम्ही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळता तेव्हा तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात, असे विराट कोहली म्हणाला होता.

रविवारी न्यूझीलंडविरुद्ध भारताला आठ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने १११ धावांचे लक्ष्य १४.३ षटकांत दोन विकेट गमावून पूर्ण केले.

… तर क्षमता नाही, असे रोहितला वाटेल : गावस्कर

उपकर्णधार रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याबद्दल माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी संघ व्यवस्थापनाला फटकारले आहे.

सलामीला बढती मिळालेला ईशान किशन हा मिस आणि हिट खेळाडू आहे. त्याच्यासारखा फलंदाज चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळला तर बरे होईल. त्यावेळी तो खेळाच्या परिस्थितीनुसार खेळू शकतो. आता इथे रोहितला सांगण्यात आले, की डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टविरुद्ध खेळण्याच्या तुझ्या क्षमतेवर आमचा विश्वास नाही. इतकी वर्ष नियमित स्थानावर खेळणाऱ्या फलंदाजाबाबत तुम्ही असे करत असाल, तेव्हा तो स्वत: च असा विचार करेल, की माझ्याकडे क्षमता नाही. किशनने झटपट ७० धावा केल्या असत्या तर आम्ही या निर्णयाचे कौतुक केले असते. पण निर्णय चुकीचा निघाला की टीका होईल, असे गावस्करांनी म्हटले आहे.

ईशानला बढती मिळाल्यामुळे रोहित हा तिसऱ्या क्रमांकावर उतरला आणि त्यामुळे कर्णधार विराट कोहलीही त्याच्या नियमित फलंदाजीच्या क्रमांकावर येऊ शकला नाही. विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे गावस्कर यांचे मत आहे.
मला माहीत नाही की ही अपयशाची भीती आहे की नाही, परंतु मला माहित आहे की त्याने फलंदाजीच्या क्रमात जे काही बदल केले, ते अपयशी ठरले. इशान किशनसारख्या युवा खेळाडूवर सलामीची जबाबदारी देण्यात आली, असे सुनील गावस्कर म्हणाले.

विराट हा मानसिकदृष्ट्या कमकुवत : गंभीर

भारताचा कर्णधार विराट कोहली हा मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे माजी क्रिकेटपटू, खासदार गौतम गंभीरने म्हटले आहे. कोहली सध्या दडपणाखाली कामगिरी करू शकत नाही, असेही नाही. पण हो तो आवश्यक सामन्यात कामगिरी करू शकत नाही. बाद फेरीसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये त्याला धावा करता येत नाहीत. त्यामागचे कारण हे आहे की ते आता मानसिकदृष्ट्या इतके मजबूत नाहीत, असे गंभीरने सांगितले.

रोहितला सलामीला न पाठवण्याबाबत, रोहित शर्माला ओपनिंगला न पाठवण्याचा निर्णय चुकीचा होता. रोहितसारखा अनुभवी फलंदाज तुम्हाला पहिल्या सहा षटकांमध्ये झटपट सुरुवात देऊ शकत नसेल, तर पहिल्यांदाच विश्वचषक खेळत असलेल्या इशानसाठी हे खूप कठीण होते. निर्धाव चेंडुंमुळे फलंदाजांवर दडपण होते. त्यांनी एकेरी घेत राहिल्या असत्या आणि स्ट्राईक बदलले असते तर त्याच्यावर मोठे फटके खेळण्याचे दडपण आले नसते. तसेच ते इतके वाईट शॉट खेळून बाद झाले नसते, असे गंभीरने म्हटले. वरूण चक्रवर्ती हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि न्यूझीलंड संघ त्याला जास्त खेळलेला नाही. अशा स्थितीत तो मोठा धोका ठरू शकतो, पण बोर्डावर अधिक धावा असणे आवश्यक होते. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे. बुमराह वगळता कुणीही लयीत गोलंदाजी केली नाही. शार्दूलही तसा दिसत नव्हता, असे गंभीरचे मत पडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -