शिबानी जोशी
भारताचं स्वदेशी विज्ञान आंदोलन म्हणजेच विज्ञान भारती. स्वातंत्र्यपूर्व काळात जी विज्ञानाची चळवळ सुरू झाली, आंदोलन झालं, त्यात जो राष्ट्रीय विचार विकसित होत होता, तो राष्ट्रीय विचार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागे पडला होता. त्याचे स्वदेशी भावनेने प्रेरित होऊन पुनरुज्जीवन करणारी ही संघटना २१ ऑक्टोबर १९९१ साली स्थापन झाली. राष्ट्रीय पुनर्निर्माणचा हेतू ठेवून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये स्वदेशी विज्ञान चळवळीला पुनरुज्जीवित करून राष्ट्रीय विचारांनी विज्ञानाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विज्ञान भारतीची स्थापना झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने चालताना, स्वदेशी विज्ञान याचा विचार करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आणि संघटना, समूह आपलं काम करत होते. यात बंगळूरु इथले प्राध्यापक के. वासू तसेच इतर वैज्ञानिक होते. हे सर्व नागपूरमध्ये भरलेल्या परिषदेमध्ये १९९१ साली एकत्र आले आणि त्यांनी स्वदेशी विज्ञान आंदोलन म्हणजेच विज्ञान भारती स्थापन करण्याचे ठरवले. हळूहळू देशातल्या जवळजवळ प्रत्येक राज्यात विज्ञान भारतीचे कार्यकर्ते फिरू लागले आणि विज्ञान भारतीच्या देशभर शाखा सुरू झाल्या. विदेशातही नऊ देशांमध्ये विज्ञान भारतीचे काम वेगवेगळ्या पद्धतीने चालतं. युरोपमध्ये जर्मनी, इंग्लंड, अमेरिका तसेच आखाती देशांमध्ये खूप काम चालतं. काही ठिकाणी ‘सायन्स इंडिया फोरम’ या नावाने काम चालतं. तसेच अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीमध्ये ‘जिस्ट’ या नावाने हे काम चालतं.
भारतीय परंपरेतील भौतिक आणि अध्यात्मिक विज्ञानाचं विश्लेषण करून भारतीय विज्ञानच संरक्षण करणे, राष्ट्रीय निर्माणासाठी स्वदेशी विज्ञान आंदोलनाला नवचैतन्य देणे, आयुर्वेद, जैविक शेती, वास्तुविद्या, खगोलशास्त्र, पर्यावरण अशा क्षेत्रांत स्वदेशी विज्ञान सक्रिय करणे, सर्व भारतीय भाषांमध्ये विज्ञान आंदोलन सक्रिय करणे, प्राचीन भारतातील संशोधकांनी केलेलं संशोधन लोकांपर्यंत पोहोचणं आणि युवा संशोधकांना अधिक मौलिकतेपर्यंत नेणं हे विज्ञान भारतीचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. विश्व आयुर्वेद फाऊंडेशन, इग्नाईटिंग माईन्डस, राष्ट्रीय पर्यावरण आणि ऊर्जा विकास मिशन, राष्ट्रीय आयुर्वेद छात्र संघ, शक्ती, भारतीय विज्ञान संमेलन, राष्ट्रीय युवा वैज्ञानिक मंच, विज्ञान प्रतिभा परीक्षा, विश्व वेद विज्ञान संमेलन अशा प्रकारची विविध कार्य विज्ञान भारतीतर्फे होत असतात. भारत हे फक्त संस्कृती, तत्त्वज्ञान, कला यांचे माहेरघर नसून प्राचीन विज्ञानाचंही केंद्र आहे. यजुर्वेद सभ्यता, सतपथ ब्राह्मणा, बौधन्य सुलभ सूत्र, वेदांग जोट्सना, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात बंधाऱ्याची माहिती होती. भास्कराचार्य, भारद्वाज, विश्वामित्र, चरक अशा अनेकांनी विज्ञानविषयक लिहून ठेवलं आहे. याची जाणीव करण्यासाठी विज्ञान भारतीची स्थापना झाली.
संघटनेच्या विविध कार्यक्रमातील एक म्हणजे ‘भारतीय विज्ञान संमेलन’ दर दोन वर्षांनी भरवले जाते. या आधी आपल्याकडे इंडियन सायन्स काँग्रेस भरत होती; परंतु तिथे सर्व विषय इंग्रजीमध्ये हाताळले जात असत. आपल्या भारतीय भाषांमध्ये हे विषय हाताळले गेले पाहिजेत. कारण जवळजवळ ८० ते ९० टक्के लोकांना आजही इंग्लिश येत नाही. त्यामुळे ते विज्ञानापासून दूर राहतात, विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून भारतीय भाषांमध्ये संमेलन आयोजित करण्यात येऊ लागलं. या संमेलनात भारतीय भाषांतून शोधपत्रही सादर केली जातात. उदाहरणार्थ, आपल्याकडे वाद्य तयार करणारे कारागीर आहेत. संगीतवाद्य तयार करण्याकरिता तंत्रज्ञान, विज्ञान आणि कला त्यांच्याकडे पाहिजे. तर, स्वातंत्र्यपूर्व काळात सी. व्ही. रमण यांनी सतार आणि वीणा या वाद्यांवर शोधपत्र सादर केलं होतं. आपल्या देशात हे सगळे विकसित कसं झालं, यावर संशोधन होण्याची गरज आहे; त्यामुळे अशा विषयांना विज्ञान भारती हात घालते.
आयुर्वेद हे आपलं वैद्यकीय पुरातन विज्ञान आहे. वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस या नावानं त्यावरही दर दोन वर्षांनी परिषद भरवली जाते. दोन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथे ही परिषद भरली होती. त्यात चाळीस देशांतून तज्ज्ञ आले होते आणि साडेसातशे शोधपत्र आली होती. यात भौतिक शास्त्र, अंकगणित याचाही आयुर्वेदाशी कसा संबंध आहे, असे विषय हाताळले गेले होते.
‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ या नावाने विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेतली जाते. यात एनसीईआरटी, सीबीएससी जोडले गेले आहेत. आर्यभट्ट, वराहमिहिर, जगदीशचंद्र बोस अशा शास्त्रज्ञांची ओळख करून दिली जाते. सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेतली जाते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही परीक्षा दोन वर्षांपूर्वीपर्यंत झाली. कोरोनामुळे गेल्या वर्षी थोडीशी कोलमडली पण दोन वर्षांपूर्वी इथे ४०००० भारतीय विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. कुवेतमध्ये जवळजवळ साडेआठ हजार भारतीय विद्यार्थी बसले होते. कतारमध्ये नऊ हजार विद्यार्थी बसले होते.
विज्ञान प्रसार या संस्थेतर्फे देशाच्या सर्व भाषांमध्ये ‘विज्ञान वार्तापत्र’ सुरू करायचं असं ठरवलं गेलंय आणि महाराष्ट्राची जबाबदारी विज्ञान भारतीकडे देण्यात आली आहे. याचं पहिलं वार्तापत्र ‘विज्ञान विश्व’ या नावाने नुकतंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं आहे. स्वातंत्र्य आंदोलनात विज्ञान जगताचं योगदान किती मोठे होतं? हा विषय यंदा संघटनेनं अभ्यासासाठी घेतला आहे. असं म्हटलं जातं की, १८८४ साली जगदीशचंद्र बोस यांनी पहिला सत्याग्रह केला होता. ब्रिटिशांनी विज्ञान जगतावर अन्याय केला, त्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी हे छोटंस आंदोलन केलं होतं. म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात विज्ञान क्षेत्रात सुद्धा आंदोलन झालं आहे; तर असा सर्व अभ्यास यंदा केला जाणार आहे.
आपल्या देशात जवळजवळ सहा लाख अशी गावं आहेत, ज्यांना वीज, पाणी मिळत नाही. विज्ञान भारतीचं विज्ञान, तंत्रज्ञान, शेती या क्षेत्रांत स्वावलंबी भारत बनवायचं उद्दिष्ट आहे. २००८ सालापासून डॉक्टर विजय भटकर विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच माधवन नायर, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, डॉक्टर चिदंबरम असे अनेक संशोधक विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संरक्षक म्हणून काम करत आहेत. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हेही विज्ञान भारतीशी जवळून जोडले गेले होते. विज्ञान भारती म्हणजेच विभाला मेसेचुएटस, अमेरिका इथला ऑनरेबल मेंशन अॅवाॅर्ड आणि पॉप्युलर चॉईस अॅवाॅर्ड मिळाला आहे. तसेच ‘लार्जेस्ट प्रॅक्टिकल सायन्स लेसन’ आयोजित केल्याबद्दल विभाच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंद झाली आहे. त्यामुळे विभाची ‘आभा’ अशीच पसरत राहो आणि भारतीय विज्ञानाचा प्रसार होत राहो, अशीच अपेक्षा आपण ठेवूया.