Sunday, July 6, 2025

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार

दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार

फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर




मुंबई (प्रतिनिधी) : नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावला आहे. दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोपही फडणवीसांनी केला आहे.


नवाब यांच्या आरोपांनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले. नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय, आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत, अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. या संदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन, तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल, असे फडणवीस म्हणाले.


नवाब मलिक यांनी सोमवारी सकाळी भाजप आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. चलो आज भाजप और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है, अशा कॅप्शनसहीत हा फोटो मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की, तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.

Comments
Add Comment