Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

ठाणे (वार्ताहर) : नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्याने यंदाची दिवाळी आणखी संस्मरणीय ठरणार आहे. गुरुवारी (४ नोव्हेंबर) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आहेत. या अनोख्या योगासह पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दीपावलीच्या प्रत्येक दिवशीचे महत्त्व आणि मुहूर्ताबाबत विस्तृत माहिती दिली आहे.

मंगळवारी, २ नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन आणि यमदीपदान आहे. आश्विन कृष्ण द्वादशी रोजी श्रीदत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी असते. म्हणून या दिवसास ‘गुरुद्वादशी’ असे म्हणतात. या दिवशी प्रदोषकाली आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने याच दिवशी धनत्रयोदशी-धन्वंतरी पूजन आहे. या दिवशी गरीब गरजू लोकांना दीपदान, अन्नदान, वस्त्रदान करण्याची प्रथा आहे. गरिबांनाही दिवाळी साजरी करता यावी, हा त्यामागचा उद्देश आहे.

बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी आश्विन कृष्ण चतुर्दशी क्षयतिथी आहे. या दिवशी दीपावलीचा कोणताही सण नाही. गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, लक्ष्मी-कुबेरपूजन, अलक्ष्मीनिस्सारण, महावीर निर्वाण आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी पहाटे ५.४९ वाजता आश्विन कृष्ण चतुर्दशी असल्याने याच दिवशी नरक चतुर्दशी आहे. चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे ५.४९ वाजेपासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी ६.४१ वाजेपर्यंत अभ्यंगस्नान करावयाचे आहे. गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाली आश्विन कृष्ण अमावास्या असल्याने प्रदोषकालात सायंकाळी ६ वाजून ३ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य! ते घरातून जावे यासाठी झाडूची पूजा करण्याचीही प्रथा आहे. शुक्रवार, ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, विक्रम संवत् २०७८ प्रमादीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. तसेच महावीर जैन संवत् २५४८चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी गोवर्धन पूजन आणि अन्नकूट आहे.

शनिवारी, ६ नोव्हेंबर रोजी यमद्वितीया- भाऊबीज आहे. पुढील वर्षी आश्विन कृष्ण अमावास्येच्या दिवशी मंगळवार, २५ आक्टोबर २०२२ रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले. पुढील वर्षी दिवाळी १० दिवस अगोदर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -