मुरबाड (वार्ताहर) : विवाह इच्छुकांसाठी यंदा अच्छे दिन आहेत. नोव्हेंबर ते जुलै दरम्यान विवाहाच्या ६३ तारखा आहेत, अशी माहिती मुरबाड तालुक्याचे प्रसिद्ध भटजी रवींद्र खरे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात गेल्या दोन वर्षांपासून लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला होता. या काळातही नियम पाळून काही विवाह पार पडले. अनेकांनी घरगुती कार्यक्रम करून आपल्या मुला-मुलींचे विवाह उरकून घेतले. मात्र आता कोरोनाचे नियम शिथिल झाले असून अनेकजण धुमधडाक्यात लग्न सोहळे साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. यंदा नोव्हेंबर ते जुलै या काळात विवाहाच्या ६३ तारखा आहेत, अशी माहिती मुरबाड तालुक्याचे प्रसिद्ध भटजी रवींद्र खरे यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षांत इच्छा असूनही अनेकांचे विवाह साधेपणाने झाले आहेत. याच काळात विवाह सोहळ्यावर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-कमी होत आहे.