बुलडाणा (वार्ताहर) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत बनवायचा असेल, तर नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवावे लागेल. त्यासाठी योग्य नियोजन आणि मेहनत यांची जोड आवश्यक आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुलडाण्यातील चिखली येथे केले. बुलडाणा चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली तथा चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्था आणि भगवानदासजी गुप्ता फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिराला उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित होते. नवीन उद्योजक घडविण्यासाठी राणे यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
‘बुलडाण्याचे सध्याचे दरडोई उत्पन्न ५० ते ६० हजार रु. इतके आहे. ते वाढविण्यासाठी आपल्या विभागाकडून येथे कोणते उद्योग देता येतील आणि त्यायोगे दरडोई उत्पन्न कसे वाढेल याचा अभ्यास केला जाईल. तसे उद्योग – व्यवसाय माझ्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागामार्फत येथे आणले जातील. त्यामार्फत येथील जसा जीडीपी वाढेल तसा विकास दरही वाढेल. म्हणूनच मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत, प्रगत भारत देश उभारणे शक्य होईल आणि माझ्या विभागाकडून देशभरात तसे प्रयत्न केले जात आहेत’, असे राणे यांनी सांगितले.
‘महाराष्ट्रातील साडसत्तरा कोटी जनतेला येथे राज्य सरकार अस्तित्वात आहे असे वाटतच नाही. तीन पक्षांचे सरकार असून नसल्यासारखेच आहे. हे सरकार फक्त पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यात समाधान मानते. मोदींवर टीका करण्याची यांची लायकी तरी आहे काय?’ असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली.
मलिक यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुलडाणा येथे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. वानखेडेंबाबत नवाब मलिकांनी रान उठवले आहे असे सांगत, माध्यमांनी नारायण राणेंची यावर प्रतिक्रिया विचारली असता, राणे म्हणाले, ‘नवाब मलिक कोण आहे? त्यांचे जावई कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासून पाहावी आणि मग दुसऱ्यांवर बोलावे’. समीर वानखेडे यांच्या पाठीशी केंद्र सरकार आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना राणे म्हणाले, ‘मी आता जाईन आणि मोदी साहेबांना विचारेन की आपण पाठीमागे आहोत का?’