Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखटी-२० क्रिकेट आणि काश्मीरमधील कीड

टी-२० क्रिकेट आणि काश्मीरमधील कीड

दुबई येथे सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानकडून भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सारा देश हळहळला. दुबईच्या मैदानावर भारतीय संघाला विजय निश्चित मिळणार, असे भारतीय जनतेने गृहीतच धरले होते. विजय मिळाल्यानंतर फटाके वाजविण्यासाठी आणि मिठाई वाटण्यासाठी सर्व देशभर क्रिकेटप्रेमींनी तयारी करून ठेवली होती, पण भारतीय संघाचा पकिस्तानकडून दहा विकेट्सनी पराभव झाल्याने भारतीय जनतेला अतोनात दु:ख झाले. पराभवानंतर सर्वत्र ‘अरेरे, असे व्हायला नको होते’, असे उद्गार प्रत्येकाच्या मनात आले.

टी-२० विश्वचषक सामन्यातील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानबरोबर होता. त्यामुळे या सामन्याबद्दल संपूर्ण देशभर उत्सुकता होती. क्रिकेट खेळाडूंपेक्षाही दोन्ही देशांतील जनता आपणच मैदानात आहोत, या भावनेने सामना बघत असते. सामन्यातील जय-पराजय हा प्रत्येकाच्या भावनेशी निगडित असतो. भारतीय संघ क्रिकेटच्या मैदानात उतरला की, देशभक्ती कोणाला शिकवायला लागत नाही. सारा देश उत्स्फूर्तपणे या सामन्याशी समरस झालेला असतो. पराभवानंतर सारा देश शोकात असताना काश्मीर आणि पंजाबमधील काही अतिउत्साही विद्यार्थ्यांनी जल्लोश साजरा केला. काश्मीरमध्ये तर कॉलेजच्या मुला-मुलींच्या एका टोळक्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देऊन नंगानाच केला. भारताच्या पराभवाने व पाकिस्तानच्या विजयाने या टोळक्यांनी आनंद व्यक्त केला. कॉलेजच्या आवारात पाकिस्तानधार्जिण्या मुलांनी धुडगूस घातला. मोबाईल शूटिंग आणि सीसीटीव्हीमुळे ही दृश्ये दुसऱ्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचली आणि जनतेत संताप व्यक्त झाला.

काश्मिरी युवकांच्या नंगानाचाचा निषेध करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले नाहीत किंवा जाहीरपणे मोठा आक्रोश केला नाही, याचा अर्थ असा नव्हे की, भारतीय जनतेने पाकिस्तान धार्जिण्या घोषणा सहन केल्या आहेत. ज्यांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्या ते विद्यार्थी श्रीनगरच्या मेडिकल कॉलेजमधील आहेत. अशा घोषणा देणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्याही मोठी होती. भारतात राहायचे, भारत सरकारच्या आर्थिक मदतीवर चाललेल्या मेडिलक कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचे, इथल्या थाळीत जेवायचे आणि याच देशाच्या विरोधात घोषणा द्यायच्या हा गद्दारपणा आहे. ज्यांनी क्रिकेट सामन्याचे निमित्त करून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या, त्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेतच, पण त्यांना लवकरात लवकर कठोर शासनही व्हायला हवे. भारताच्या भूमीवर शत्रू राष्ट्राच्या झिंदाबादच्या घोषणा दिल्यावर काय कठोर शासन होते, हे देशालाही समजले पाहिजे.

पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव करून टी-२० सामना जिंकल्यावर श्रीनगरच्या एसकेआयएमएस मेडिकल कॉलेज व शासकीय मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा विजय साजरा केला. पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी यूएपीए खाली गुन्हे दाखल केले आहेत. दहशतवाद्यांवर जसे गुन्हे दाखल करतात, तसेच गुन्हे या विद्यार्थ्यावर पोलिसांनी नोंदवले आहेत. या जल्लोषाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे नंगानाच घालणारे कोण होते, ते शोधणे पोलिसांना सोपे गेले. पंजाबमधील दोन शिक्षण संस्थांतील काश्मिरी विद्यार्थ्यांनी असाच जल्लोष साजरा केला. संगरूर शहराबाहेरील भाई गुरुदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नाॅलॉजी या संस्थेत ही घटना घडली. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांची त्याच शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या उत्तर प्रदेश व बिहारमधील विद्यार्थ्यांनी अक्षरश: पिटाई केली. राजस्थानमध्येही एका शिक्षकाने पाकिस्तानच्या विजयानंतर ‘आमचा विजय झाला’, अशी पोस्ट टाकली. नंतर जनक्षोभ बघून त्याने माफी मागितली, पण त्या माफीला बराच उशीर झाला होता, त्यापूर्वीच त्याची नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली.

पाकिस्तानकडून भारतीय संघाच्या झालेल्या पराभवाचा या देशात कोणाला आनंद होत असेल, तर त्यांची रवानगी तुरुंगातच झाली पाहिजे. अशी वृत्ती म्हणजे या देशाला लागलेली कीड आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या प्रदेशाला पं. नेहरूंच्या कारकिर्दीपासून घटनेत तरतूद करून विशेष अधिकार दिलेले होते. भारतीय संसदेने केलेला कायदा जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत संमत झाल्यावरच त्या प्रदेशाला लागू होत असे. काश्मीरमध्ये बाहेरील कोणालाही जमीन किंवा अन्य मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला दिलेले विशेष अधिकाराचे कवच काढून घेतले. संसदेने त्याला एकमताने संमती दिली आणि जम्मू-काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हजारो कोटींच्या योजना राबवण्यास प्रारंभ झाला. गेल्या सात वर्षांत काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढण्याचा मोदी सरकारने चंग बांधला. रेल्वे, रस्ते, पूल, शिक्षण संस्था, रोजगार यावर मोदी सरकारने मोठी भरीव गुंतवणूक केली. काश्मिरी तरुणांना शिक्षण व रोजगार आपल्या राज्यात मिळाला पाहिजे, असा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. पण पाकिस्तानचा विजय साजरा करणारी किड आजही या राज्यात शिल्लक आहे, हे दुबईच्या सामन्यानंतर दिसून आले. भारताच्या भूमीवर राहायचे, येथे सर्व सवलती मिळवायच्या, सरकारी अनुदानाने मेडिकलचे शिक्षण घ्यायचे, पण ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देणारे डॉक्टर्स निर्माण होत असतील, तर त्यांचा देशाला काय उपयोग?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -