Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीएसटीच्या दरवाढीने प्रवाशांचेच दिवाळे

एसटीच्या दरवाढीने प्रवाशांचेच दिवाळे

देवा पेरवी

पेण : गेल्या २५ ऑक्टो.च्या मध्यरात्रीपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्यात आल्याने त्याचा फटका आता सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. एकीकडे सतत वाढत चाललेली इंधनवाढ आणि दुसरीकडे एसटी महामंडळाचा होणारा तोटा लक्षात घेता आपल्या हिताची बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांवरच आर्थिक भार टाकून प्रवाशांचे दिवाळे काढण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या ८ आगारांतून ४३० गाड्या कार्यरत असून दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ३६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे तिकीट दरवाढ जरी झाली असली, तरी प्रवाशांना जादा बसेस पुरवून एसटी महामंडळाने दिलासा दिला आहे.

खाजगी वाहनांपेक्षा एसटी महामंडळाच्या बसेसना अनेक प्रवासी आजपर्यंत नेहमीच पसंती देत आले आहेत. हवाहवासा आणि सुखकर वाटणारा प्रवास हा एसटी बसेसमधून होत असल्याने तसेच रात्री – अपरात्री एसटीचाच प्रवास फायदेशीर ठरत असल्याने अनेक प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास एसटी बसमधून करत असतात. मात्र २५ ऑक्टो.पासून दरवाढ झाल्याने प्रवासी एसटी प्रवासाला कितपत पसंती देतात, हे दीवाळीच्या सणाच्या दिवसांत स्पष्ट होणार आहे.

एसटी महामंडळाच्या अनेक प्रकारच्या बसेसचे वेगवेगळे जादा दर आकारण्यात आले आहेत. त्यामध्ये एका किलोमीटर मागे साध्या बसचे ७.४५ पैसे दर आकारले जात होते, ते आता ८.७० पैसे आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच या बसचे किलोमीटर मागे २१ पैसे जादा आकारले जाणार आहेत. निमअराम बसचे किलोमीटरमागील पूर्वीचे दर १०.१० पैसे आकारले जायचे, मात्र आता हेच दर ११ .८५ झाले आहेत. म्हणजेच वाढीव दराप्रमाणे यामध्ये २९ पैशांची वाढ किलोमीटरमागे झाली आहे,, तर शिवशाही बसेसचे यापूर्वीचे किलोमीटरमागील तिकीट दर १०.५५ पैसे होते ते आता १२.३५ पैसे झाल्याने हे दर ३० पैशांनी वाढले आहेत. म्हणजेच एकंदरीत या तीनही प्रकारच्या बसमध्ये कि.मी. मागे २१ ते ३० पैशांची दरवाढ झाली आहे.

रायगड विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीला एकूण आठ आगारांमध्ये ४३० गाड्या कार्यरत असून या गाड्यांच्या ये-जा करणाऱ्या १८०० ते १९०० फेऱ्या होत आहेत, तर दिवाळी सणाचा विशेष करून भाऊबीजेच्या दिवशीचा लोड लक्षात घेता या गाड्यांमध्ये ३६ जादा गाड्यांची नोंद करण्यात आली आहे. या जादा गाड्यांच्या ४२ फेऱ्या होणार आहेत.

त्यामुळे दीपावली सणामध्ये रायगड जिल्ह्यातील ८ आगारांमधून जवळपास दोन हजार फेऱ्या प्रवाशांसाठी एसटी बसेसच्या होणार आहेत. त्यामुळे एसटी बसेसची तिकीट दरवाढ जरी झाली असली, तरी अनेक प्रवासी सुरक्षित प्रवासासाठी एसटीने प्रवास करतील अशी चिन्हे दिसत असून सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी एसटीचाच प्रवास करा, असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.

सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी एसटीतूनच प्रवास करा. – अनघा बारटक्के, रायगड विभाग नियंत्रक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -