Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यनिवडणुकीची दिवाळी

निवडणुकीची दिवाळी

सीमा दाते

दिवाळीचा सण म्हटलं की, सगळ्या सणांपेक्षा मोठा सण असतो, गेल्यावर्षीची दिवाळी ही कोरोनामुळे सगळ्यांसाठी वाईट होती, असे म्हणता येणार नाही, मात्र दरवर्षीपेक्षा ती वेगळी होती. लोकांना ती साजरी करता आली नाही. कोरोनाचा हाहाकार, कोरोनाची भीती, लोकांना आलेले आर्थिक संकट, सरकारचे निर्बंध या सगळ्यांमुळे दिवाळी साजरी करता आली नाही. केवळ जनतेलाच नाही, तर राजकीय पक्षांना देखील ती मोठ्या प्रमाणात साजरी केली नाही. मात्र यंदाची दिवाळी ही जरा वेगळीच, एक तर कोरोनानंतरची आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीची! होय, या दिवाळीनंतर आगामी पालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि मग खऱ्या अर्थाने निवडणुकीची तयारी पाहायला मिळेल.

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे, या मायानगरी मुंबईच्या महापालिकेची सत्ता काबीज करायला सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करीत आहे. मात्र आता दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने त्याचे पडघम वाजतील. दिवाळी म्हणजे जणू काही राजकीय पक्षांसाठी मुहूर्तच आहे. कारण या मुहूर्तापासूनच निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे. सगळ्याच पक्षांची सध्या स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता तयारीला लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मतदारराजाला खूश करण्यासाठी सगळ्याच पक्षाचे प्रयत्न सुरू होतील.

सध्या पालिकेत सत्ताधारी असलेला शिवसेना देखील स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. मात्र यामुळे मुंबईत एक हाती सत्ता येईल का, यावर मात्र जरा प्रश्नच उभा राहतोय. राज्यात सत्ता स्थापन करायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतल्यामुळे आधीच शिवसैनिकांसह जनताही नाराज झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल का, याबाबत मात्र शंकाच आहे. असे असताना सध्या मतदारराजाला खूश करण्यासाठी मोठ्या घोषणा, मोठे प्रकल्प सत्ताधाऱ्यांकडून केले जातायत.

मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोनस! महापालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना थेट २० हजार रुपये बोनस जाहीर केला आहे आणि तेही केवळ या एकाच वर्षी नाही, तर इथून पुढे सलग तीन वर्षं २० हजार इतकाच बोनस दिला जाणार आहे. कोरोना काळात पालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात सेवा दिली, हे खरं आहेच. त्यामुळे त्यांना हे बोनस मिळाले असल्याचे जरी सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं गेलं असलं तरी, महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी २०१९ साली तबबल नऊ दिवसांचा संप केला, गिरणी कामगारांनंतरचा सगळ्यात मोठा संप म्हणून या संपाची नोंदही झाली होती; मात्र तरीही सत्ताधाऱ्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पगारवाढ दिली होती. त्यामुळे आता अचानक सत्ताधाऱ्यांना बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुळका का? तर आगामी निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना, मतदारराजांना खूश करण्यासाठी हा बोनस जाहीर केला आहे. रस्त्यांच्या कामाच्या कोट्यवधींच्या निविदा, मालमत्ता कर यासंदर्भात घेतलेले निर्णय हे केवळ आणि केवळ निवडणूक समोर ठेवून घेतले असल्याचं दिसत आहे.

बरं, केवळ सत्ताधारी पक्षच नाही तर इतर पक्षही या दिवाळीचा मुहूर्त साधून तयारीला लागले आहेत. प्रत्येक विभागात असलेल्या पक्षाकडून तेथील नगरसेवक, कार्यकर्ते या सगळ्यांकडून मतदारराजाला खूश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, त्यात दिवाळीच्या शुभेच्छांचे कार्ड घरी पाठवणे, उटणे किंवा मग वैयक्तिक भेट घेणे, एखादा कार्यक्रम आपल्या भागात राबवणे, समाजोपयोगी काम करणे, एखाद्या गल्लीचे चौकाचे नामकरण करणे, अशी अनेक कामं दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू आहेत. केवळ आपल्या विभागातील मतदारराजाला खूश करण्यासाठीच नाही, तर त्यांना वैयक्तिक भेटण्यासाठी, त्यांच्यापर्यंत आपण केलेली कामे पोहोचण्यासाठी दिवाळी हे खास निमित्त आहे, मतदारराजांशी संवाद साधण्यासाठी. सध्या महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सगळेच पक्ष तयारीला लागले आहे, समाजवादी पक्षाने आधीच स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनतर काँग्रेस देखील स्वबळावर लढण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादीचीही तीच अवस्था आहे तर शिवसेनेनेही आपण स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे.

सध्या मुंबई मनपात पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे ९७ नगरसेवक – यात अपक्ष ३ व मनसेतून आलेले ६ नगरसेवक – तर, भाजप ८२ (एका सदस्याचे निधन) आणि काँग्रेस २९ व राष्ट्रवादी काँग्रेस ८ असे बलाबल आहे. मनसे १, सपा ६, एमआयएम २ अशी अन्य नगरसेवकांची संख्या आहे. भाजप आणि शिवसेनेतील सदस्यांमध्ये फारसा फरक नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी भाजप आणि मनडसे युतीची देखील शक्यता वर्तवली जाते, मात्र जर ही युती झाली तर शिवसेनेसाठी ही निवडणूक अटीतटीची असणार आहे. एकूणच दिवाळीनंतर सगळेच पक्ष तयारीनिशी रणांगणात उतरणार आहेत, हे मात्र नक्कीच.

seemadatte12@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -