Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीप्रभाग फेररचनेविरोधात भाजपचे आंदोलन

प्रभाग फेररचनेविरोधात भाजपचे आंदोलन

आयुक्तांना गुलाब भेट

सीमांकनात नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिकेने तयार केलेल्या प्रभागांच्या फेररचनेच्या सीमविरोधात भाजपने सोमवारी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. सर्व नियम धाब्यावर बसवून हे सीमांकन करण्यात आले असून या घोटाळ्याविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना गुलाबपुष्प देत आंदोलन केले. तसेच आयुक्तांच्या संगनमताने प्रभागाच्या फेररचनेच्या मसुद्याचा पेनड्राईव्ह रातोरात बदलला, असा आरोप भाजपने केला आहे. या विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी महानगर पालिका मुख्यालया बाहेरही निदर्शने केली.

दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. यात शिवसेनेने एका बाह्य खासगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा आरोप भाजपने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या फेररचना मोठ्या प्रमाणात राजकिय सोयीसाठी बेकायदेशीररीत्या फेरफार करण्यात आला असून ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे, तर पश्चिम उपनगरातील देखील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

सत्ताधारी पक्षाने नवीन प्रभाग फेररचना केवळ राजकीय फायदा पाहून केली असून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच केली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी अशी मागणी भाजपने आयुक्तांना पत्र देत केली आहे.

अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच याबाबत भाजप न्यायालयात देखील जाईल, असा इशारा भाजपने दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -