सेल्फी : चंद्रकांत बर्वे
ज्यांना छोटी-मोठी सिक्युरिटी आहे, असे काही नेते दूरदर्शनमध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतात. पण त्यातले काही उथळ नवखे मात्र आपली सिक्युरिटी दाखवण्यास उत्सुक असतात. एका कवीला त्या काळात असेच एक महामंडळाचे पद मिळाले होते, त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. केबीनमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचा बंदुकधारी सुद्धा आला. माझ्या लक्षात येईना, या प्रेमकविता लिहिणारा ज्याने आपल्या कवितेतून कुणाला दुखावलेले नाही, त्याला सिक्युरिटीची काय गरज? आमची चर्चा झाल्यावर मग त्यांनी मला विचारलं, तुमचे केंद्राचे डायरेक्टर कोण आहेत. मी म्हटलं जी. के. कुलकर्णी आहेत. कुलकर्णी असले तरी कन्नड आहेत. त्यांना मराठी कळत नाही (थोडक्यात म्हणजे तुमच्यासारख्या कवीला ते ओळखत नाहीत) आता खरं म्हणजे एवढी माहिती त्यांना पुरेशी होती. पण ते म्हणू लागले, मला त्यांची ओळख करून द्या.
आता पाहुण्याने असा हट्ट धरल्यावर मी तरी काय करणार? आम्ही निघालो. तो बंदुकधारी देखील आमच्याबरोबर होताच. मी डायरेक्टर साहेबांच्या केबीनमध्ये जाण्यापूर्वी त्या बंदुकधारीला थांबवले. मी त्याला म्हटलं, तुम्ही इथेच थांबा, आम्ही साहेबांचा परिचय करून देऊन दोन मिनिटांत बाहेर येतो. तो तिथे जरा थबकला. मी व कवी महोदय आतमध्ये गेलो. मी साहेबांचा परिचय करून देत असताना तेवढ्यात बंदुकधारी कवी महोदयांच्या शेजारी येऊन उभा ठाकला. हॅलो, हाय करून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर मी त्या बंदुकधाऱ्यांकडे नाराजीने बघितले, त्यावर तो म्हणाला, आम्हाला आमच्या साहेबांच्या स्पष्ट सूचना आहेत, कोणाशीही प्रथम परिचय करून देताना आम्हाला त्यांच्या शेजारी उभं राहावंच लागतं.
आय सी! म्हणजे हा बरोबरचा बंदुकधारी हा त्यांच्या स्टेट्स सिम्बॉलचा भाग आहे तर! आहे कवी पण मनाने हळवा नाही, तर बनेल आहे. गुड.
मी राजकोटला असताना तिथले खासदार साहेब हे केंद्रीय मंत्री होते; त्यामुळे त्यांचा रुबाब मोठा अन् अर्थात राजकोटचे ते सगळ्यात व्हीआयपी होते, पण त्यांना प्रसिद्धीची खूप म्हणजे खूपच हौस होती. जरा काही इकडे तिकडे ते रिबीन कापायला गेले तरी दूरदर्शनचा कॅमेरा हा असायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असे. सरकार त्यांचे आणि ते सरकारचे! आणि दूरदर्शन तर सरकारचेच त्यामुळे, असो!
ते दर महिन्याला जेव्हा राजकोटला यायचे तेव्हा त्यांचा टूर प्रोग्रॉम ते आम्हाला फॅक्सने पाठवत. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा दूरदर्शनने कव्हर करावा, अशी त्यांची अपेक्षा असे. आता त्यांच्या या प्रेशरला मला सारखे नाही म्हणणे शक्य नसायचे. पण जिथे शक्य होईल जिथे मी ते टाळायचा प्रयत्न करायचो, कारण आमच्या त्या साप्ताहिक न्यूज राऊंडअपच्या कार्यक्रमात सारखे तेच मंत्री महोदय दिसणे मला योग्य वाटायचे नाही.
बरेचदा मिनिस्टर साहेब सांगायचे की, या तारखेला दुपारी ३.३० वा. कॅमेरा घरी पाठवा. साहेब एक पॉलिसी स्टेटमेन्ट दूरदर्शनला देऊ इच्छीतात. कॅमेराटीम जायची. त्यावेळी पाहुण्याची गर्दी असायची. कॅमेराटीमला छानपैकी चहापाणी दिले जायचे. तिथे दोन तासांने इतर पाहुणे गेले, म्हणजे सामसूम झाली की, मंत्री महोदय काहीतरी थातूर-मातूर स्टेटमेन्ट द्यायचे. माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली. दोन तास आपल्या टीमला थांबवून त्यांनी जे थातूर मातूर स्टेटमेन्ट दिले ते आम्ही प्रसारित नाही केले, तरी त्यांची काहीही तक्रार नसायची.
एकदा मात्र वेगळीच गोष्ट घडली आणि त्या सुमारास या मंत्री महोदयांनी खरेच महत्त्वाचे निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतलेले होते. तेव्हा त्यांची या संबंधीचे सविस्तर स्टेटमेन्ट आम्हालाही हवे होते. मिनिस्टर साहेबांचा दूरदर्शनला टूर प्रॉग्राम आला. एका कार्यक्रमाला ते जाणार होते ते स्थळ दूरदर्शनच्या शेजारीच होते. नेहमीप्रमाणे त्यांनी स्टेटमेन्ट द्यायला आमची टीम मागितली. मी मिनिस्टरसाहेबांना विनंती केली की साहेब, आमचा कॅमेरामन तुमच्या घरी तुमचे सिंगल कॅमेरापुढे तेवढे निवेदन घ्यायच्या ऐवजी एका कार्यक्रमासाठी तुम्ही दूरदर्शनच्या शेजारीच येणार आहात, तर तो कार्यक्रम झाल्यावर किंवा पूर्वी तुम्ही आमच्या केंद्राला भेट द्या. तिथे आपली सविस्तर मुलाखतीची स्टुडिओत तीन कॅमेरावर रेकॉर्डिंगची सोय करतो. त्याची क्वालिटीही उत्तम राहील. आले मंत्री महोदय, आले. मुलाखत दिली. अन् शेजारच्या कार्यक्रमाला गेले. साहेब गेल्यावर त्यांचा पी. ए. मात्र मला भेटला अन् म्हणाला, साहेब तुमच्यावर खूश आहेत. तुम्ही अवर्जून साहेबांना बोलावलात वगैरे. माझा इगोही थोडासा सुखावला. पण नंतर पी. ए. मला म्हणाले, तरीही सायंकाळी ७.०० वा. घरी कॅमेरा पाठवाच. मी म्हटलं अहो, एवढी सविस्तर त्यांची मुलाखत घेतलीच आहे की! त्यावर मात्र त्यांच्या पी. ए.ने मला सरळ अंदरकी बात सांगून टाकली. काय आहे की, तुमच्या दूरदर्शनची टीम, तो कॅमेरा, ते लाइटस्, तो ट्रायपॉड अशा गोष्टी असल्या ना की त्यांच्याकडे येणारी जी पाहुणे मंडळी असतात, त्यांच्यावर प्रभाव पडतो.
तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माणसाचे स्टेट्स फक्त लाल दिव्याची गाडी आणि बंदुकधारी सिक्युरिटी गार्डनेच वाढते, असे नाही ते आणखी वाढवायला साहेबांची वाट बघत एक कॅमेराटीमही असावी लागते.