पंतप्रधान मोदींचे पोप यांना निमंत्रण
व्हॅटिकन सिटी (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-२० देशांच्या शिखर बैठकीसाठी इटलीला गेले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. यावेळी व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची ही पहिलीच समोरा-समोर झालेली भेट होती.
पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय स्नेहमय भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले, असे पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर म्हटले आहे. पोप, रोमन कॅथोलिकचे प्रमुख असतात, म्हणजेच ते ख्रिचनांचे धर्मगुरू असतात.
या अगोदर पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्रागी यांची भेट घेतली होती. दोन्ही पंतप्रधानांमध्ये शिष्टमंडळस्तरावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला होता. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी युरोपियन युनियनच्या नेत्यांची देखील भेट घेतली.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि इटलीचे पंतप्रधान द्रागी यांच्यात बैठक झाली. कृती आराखड्याद्वारे संबोधित केलेल्या धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ज्यामध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्याच्या मुद्द्याचा समावेश आहे. तसेच, भारत आणि इटलीने आपापल्या ऊर्जा प्रणालीमध्ये अक्षय उर्जेच्या वाढत्या प्रमाणात खर्च-प्रभावी एकत्रीकरणावर सहमती व्यक्त केली.
युरोपीय नेत्यांशी पंतप्रधानांची चर्चा
पंतप्रधान मोदींच्या रोम दौऱ्याचा शनिवारी दुसरा दिवस होता. मोदी शनिवारी जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि संबोधितही करणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती आणि फ्रान्सचे राष्ट्रपतींची देखील भेट घेणार आहेत. या सर्व नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी जागतिक, आर्थिक, राजकीय व कोरोना महामारीबाबत स्वतत्रपणे द्विपक्षीय चर्चा करतील.
२०१३ मध्ये पोप बनल्यानंतर पहिलीच भेट
फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोप बनल्यानंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानांशी भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे, नरेंद्र मोदी हे पोप यांची भेट घेणारे पहिले भारतीय पीएम आहेत. वॅटीकेनमध्ये मोदींसमेवत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही मोदींसमवेत हजर होते. मोदींनी व्हॅटीकन सिटीचे परराष्ट्रमंत्री पिएत्रो पॅरोलिन यांच्यासमवतेही चर्चा केली.
इटलीवरुन ब्रिटनला जाणार
पंतप्रधान मोदी ३१ ऑक्टोबरला इटलीहून ब्रिटनला रवाना होणार आहेत. येथे ते ग्लासगो, स्कॉटलंड येथे होणाऱ्या सीओपी२६ क्लायमेट चेंज समिटमध्ये सहभागी होतील.