भारतासह न्यूझीलंडला विजय अनिवार्य
दुबई (वृत्तसंस्था) : यूएईत सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीतील (ग्रुप २) महत्त्वपूर्ण ‘संडे स्पेशल’ लढतीत (३१ ऑक्टोबर) दुसऱ्या सामन्यामध्ये माजी विजेता भारताची गाठ न्यूझीलंडशी पडेल. अपयशी सुरुवातीनंतर स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.
दोन्ही संघांचा पाकिस्तानकडून पराभव
भारत आणि न्यूझीलंडमधील समान धागा म्हणजे दोन्ही संघांचा एकाच म्हणजे, पाकिस्तान संघाकडून पराभव झाला आहे. ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हेच तीन बलाढ्य संघ आहेत. ग्रुपमधून अव्वल दोन संघांसाठी याच तीन संघांमध्ये लढत आहे. त्यात सलग तीन सामने जिंकून पाकिस्तानने गटात पहिले स्थान मिळवले. दुसऱ्या स्थानासाठी भारतासह न्यूझीलंडमध्ये चुरस आहे.
भारत संघ कायम ठेवणार?
भारताचा पाकिस्तानविरुद्धचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे; मात्र मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या समावेशासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर विचार होऊ शकतो, तसेच त्याचा गोलंदाज म्हणूनही उपयोग केला जाऊ शकतो. शार्दुल ठाकूर संघात आल्यास वरूण चक्रवर्तीला संघाबाहेर जावे लागेल. अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनला खेळवण्याची मागणी आहे; मात्र तसे झाल्यास दोन फिरकीपटूंसह खेळावे की एक मध्यमगती गोलंदाज कमी करावा, यावरूनही मतमतांतरे असू शकतात. त्यामुळे किवींविरुद्ध अंतिम संघ निवडताना संघ व्यवस्थापनासह मेंटॉर महेंद्रसिंग धोनीचा कस लागेल.
फलंदाजीत ‘आर फॅक्टर’ महत्त्वाचा
उपकर्णधार रोहित शर्मासह लोकेश राहुल या सलामीवीरांनी निराशा केली, तरी न्यूझीलंडसह उर्वरित स्पर्धेत फलंदाजीत भारतासाठी ‘आर फॅक्टर’ महत्त्वाचा असेल. त्यांच्यासह पाकिस्तानविरुद्ध संयमी खेळी करणारा कर्णधार विराट कोहलीवरही फलंदाजीची भिस्त असेल. सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्याकडूनही बॅटिंगमध्ये चांगले योगदान अपेक्षित आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान त्रिकुटावर भारताच्या गोलंदाजीची भिस्त असेल. त्याचबरोबर डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाच्या फिरकी माऱ्यावरही बॉलिंगमधील यशापयश अवलंबून आहे.
न्यूझीलंडला खेळ उंचावण्याची गरज
भारताप्रमाणे न्यूझीलंडला सर्व आघाड्यांवर खेळ उंचावण्याची गरज आहे. पाकिस्तानविरुद्ध डेवॉन कॉन्वेसह डॅरिल मिचेल तसेच कर्णधार केन विल्यमसनने थोडा प्रतिकार केला, तरी त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अनुभवी मार्टिन गप्टीलसह जेम्स नीशमला सूर गवसला नाही. शेपूट फार न वळवळल्याने फलकावर धावा कमी लागल्या. लेगस्पिनर ईश सोढीसह मिचेल सँटनर आणि टिम साउदीने अचूक मारा केला, तरी कमी धावसंख्येमुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
कोहली आणि कंपनी डब्ल्यूटीसी फायनलचा बदला घेईल?
गेल्या वर्षी फेब्रुवारीतील न्यूझीलंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने होते. त्यात भारताने न्यूझीलंडचा ५-० असा धुव्वा उडवला. त्या मालिकेतील पराभवाचा वचपा घेण्याची संधी न्यूझीलंडला आहे. दुसरीकडे, पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला केन विल्यमसन आणि सहकाऱ्यांकडून मात खावी लागली. या पराभवाचा बदला घेण्यासाठी विराट कोहली आणि कंपनी उत्सुक आहे.
वेळ : सायं. ७.३० वा.