स्टेटलाइन : सुकृत खांडेकर
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी नार्कोटिस कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गेले तीन आठवडे आरोपांचा भडीमार चालवला आहे. वानखेडे हे मुस्लीम आहेत, त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे आणि त्यांनी अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून इंडियन रेव्ह्युन्यू सर्व्हिसमध्ये मोठ्या पदाची नोकरी मिळवली आहे, असा मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. मुंबईच्या समुद्रात झालेल्या क्रूज पार्टीमध्ये एनसीबीने छापा घालून ज्यांच्याकडे काहीही सापडले नाही, त्यांना अटक करून जेलमध्ये डांबले आणि ज्याने पार्टी आयोजित केली त्याला मोकाट सोडले असाही त्यांनी आरोप केला. गेल्या वीस दिवसांत मलिक यांनी व्हीडिओ क्लीप्स, विविध कागदपत्रांच्या व प्रमाणपत्रांच्या फोटो प्रति आदी रग्गड पुरावे जाहीर केले असून समीर वानखेडे यांची नोकरी, तर जाईलच पण त्यांची रवानगी तुरुंगात होईल, अशी धमकीही दिली. आपले आरोप खोटे ठरले, तर आपण मंत्रीपदाचा राजीनामा देऊ असे त्यांनी जाहीर करून अमली पदार्थांच्या विरोधात काम करणाऱ्या सर्वोच्च केंद्रीय तपास यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या गूढ आत्महत्येपासून अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या अनेक बड्या बड्या सेलिब्रेटींचा नि त्यांच्या मुलाबाळांचा पर्दाफाश होऊ लागला. एनसीबीच्या धाडी वाढत राहिल्या आणि एनसीपीचे मुंबईचे बाॅस समीर वानखेडे सतत प्रकाशझोतात राहिले.
आश्चर्य वाटते ते मलिकांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात चालवलेल्या मोहिमेचे. राज्याचा एक मंत्री एका केंद्रीय वरिष्ठ अधिकाऱ्याला टार्गेट करून त्यांच्या मागे हात धुवून लागला आहे. त्याला त्याच्या करिअरमधून संपविण्याचा त्यांनी जणू विडाच उचलला आहे. मलिक हे मूळचे उत्तर प्रदेशचे. बलारामपूर जिल्ह्यातील उत्तरौली गावचे. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेटमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा आहेत. ते सुरुवातीला मुलायम सिंग यादव यांच्या समाजवादी पक्षात होते. १९९६ मध्ये त्यांनी नेहरूनगर (कुर्ला)मधून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून ते विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले. १९९९ मध्ये पुन्हा ते सपाचे आमदार म्हणून विजयी झाले. २००४ मध्ये ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. २००४, २००९ व २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. आता पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. २०२० मध्ये मलिक यांच्यावर पक्षाच्या मुंबईचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
गेल्या वर्षी सुशांतसिंग राजपूत आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणी जेलमध्ये पाठविण्यात आले होते, त्या चौकशीत समीर खानचे नाव आले. समीर खान हा नवाब मलिक यांचा जावई. एनसीबीने त्याला या वर्षी १३ जानेवारीला अटक करून जेलमध्ये पाठवले. तेव्हापासून मलिकांच्या रडारवर समीर वानखेडे आहेत. त्यांच्या जावयाला तब्बल आठ महिने तुरुंगात राहावे लागले. आपल्या जावयाला खोट्या केसमध्ये फसवले असा आरोप मलिक यांनी केला होता.
समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव कचरू वानखेडे हे १९७५ मध्ये मुंबई पोलीस दलात नोकरी करीत होते. डी. के. वानखेडे अशी त्यांच्या नावाची नोंद होती. १९७६ मध्ये त्यांनी झहेदा बानोशी विवाह केला. तेव्हा दाऊद वानखेडे अशी नोंद होती. यास्मीन ही मुलगी व समीर हा त्यांचा मुलगा. समीरचे शिक्षण रूईया कॉलेजमध्ये झाले. पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठात पूर्ण केले. ७ डिसेंबर २००६ रोजी त्याचा अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये शबाना कुरैशीबरोबर विवाह झाला. त्याचा निकाहनामाही जारी करण्यात आला होता. समीर २००७ मध्ये यूपीएससीमध्ये यशस्वी झाला. समीर ज्ञानदेव वानखेडे असे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर करून २००८ मध्ये त्याने इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये कमिशन मिळवले. समीरची आई झहेदाचा एप्रिल २०१५ मध्ये मृत्यू झाला. २०१६ मध्ये पहिली पत्नी शबानाशी त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१७ मध्ये मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरशी त्याने दुसरा विवाह केला.
‘माझी आई मुस्लीम होती आणि बाबा हिंदू आहेत. आईने मला त्यावेळी मुस्लीम पद्धतीने विवाह करायला सांगितला. आईला दिलेला शब्द पाळला. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला, त्याच महिन्यात स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत नोंदणीही केली,’ असा खुलासा त्याने केला आहे.समीर वानखेडे हा मुस्लीम आहे, हे सांगण्यासाठी मलिक यांनी त्याची पत्रिका व फोटो ट्वीट केले आहेत. धर्मांतर केले असेल, तर अनुसूचित जातीचा लाभ त्याला कसा काय मिळू शकतो, असा त्यांचा सवाल आहे. मलिक विरुद्ध वानखेडे अशा संघर्षात स्वत: समीर यांनी फारशी उडी घेतलेली नाही. मलिक यांचे आरोप धांदांत खोटे आहेत, एवढेच ते सांगत राहिले. मात्र त्यांची पत्नी क्रांती हिने मात्र मलिकांच्या हल्ल्याला प्रतिकार करण्याचा धारदार प्रयत्न केला. मलिकांचे आरोप चोमडेपणाचे आहेत, किचन पाॅलिटिक्समधून बाहेर या, असे तिने खडसावले आहे. माझा पती खोटारडा नाही, असे तिने म्हटले आहे. समीरच्या वडिलांनीही आपले नाव दाऊद नाही तर ज्ञानदेव आहे, असा खुलासा केला आहे. क्रांतीनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एका महिलेल्या प्रतिष्ठेशी खेळ खेळला जात आहे, बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांना हे मुळीच सहन झाले नसते, असे म्हटले आहे.
क्रूजवर तेराशे लोक होते, मग केवळ तेरा जणांना का अटक झाली, ड्रग सापडले नाही, मेडिकल टेस्टही झाली नाही, मग आर्यनला अटक का, बाॅलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी एनसीबीचा वापर केला जातोय का, या प्रश्नांना उत्तर कोण देणार? राज्याच्या बदनामीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातोय असे ठाकरे व पवार यांनी अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे, म्हणून वानखेडेंचा बळी घेण्याचा प्रयत्न होतो आहे काय, किरण गोसावी किंवा प्रभाकर साईल हे क्रूज पार्टीवरील प्रमुख साक्षीदार तेच एकमेकांवर फितूर झाल्याचे किंवा खंडणीचे आरोप करीत आहेत, पंचवीस कोटींचे डिल फिस्कटले किंवा दिलेली कमिटमेंट पाळली गेली नाही म्हणून एकमेकांची बदनामी चालू आहे का, ज्या तत्परतेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ठाकरे सरकारने अटक करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली मग एनसीबीच्या संचालकाला थेट धमकी देणाऱ्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यावर कारवाई काय केली? मलिक हे गेले महिनाभर डिटेक्टिव्ह असल्यासारखे वागत आहेत. ते करीत असलेल्या आरोपांवर शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी कधी ब्र सुद्धा काढला नाही. मंत्र्यांना फ्री फाॅर आॅल आहे की, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच ते बोलत आहेत. न्यायालयाने आर्यन खानला पंचवीस दिवसांनंतर जामीन दिला आहे आणि समीर वानखेडे यांनाही काहीसा दिलासा दिला आहे. या सर्व प्रकरणात देशभर महाराष्ट्राचीच बेअब्रू झाली आहे. ज्या वेगाने समीर वानखेडेची जात, धर्म, कूळ, विवाह पत्रिका, जन्म दाखला या सरकारने शोधून काढला त्याच वेगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना का शोधले जात नाही?
राहुल महाजन, संजय दत्त……
भाजपचे दिवंगत बडे नेते प्रमोद महाजन यांचा पुत्र राहुल याला सुद्धा एनसीबीने अटक केली होती. ज्या कलमांखाली अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यनला अटक झाली त्याच कलमाखाली राहुलवर एनसीबीने कारवाई केली होती. त्याला सहा महिने जेलमध्ये काढावे लागले होते. पण त्याला कोणत्या अधिकाऱ्याने अटक केली किंवा त्या अधिकाऱ्याची जात, धर्म काय होता हे कुणाला ठाऊक नव्हते. अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची पत्नी कोण आहे, ती काय करते, त्याची बहीण कुठे आहे, याची चर्चा झाली नव्हती. अभिनेता संजय दत्त ड्रग्ज प्रकरणात सात महिने जेलमध्ये होता. तेव्हाही त्याला कोणत्या अधिकाऱ्याने अटक केली याच्या नावाची चर्चा झाली नव्हती. संजय दत्तला अटक करणारा अधिकारी हिंदू होता की, मुस्लीम होता हे कुणी कॅमऱ्यासमोर येऊन सांगितले नव्हते. त्या अधिकाऱ्याच्या जन्म दाखला किंवा विवाह दाखल्याची फोटो काॅपी माध्यमांपुढे कोणी आणली नव्हती. अरमान कोहली गेले आठ महिने एनसीबीच्या कोठडीत बंद आहे. पण कुठेही आरडाओरड नाही. कोणावरही आरोप नाहीत. एनसीबीच्या अधिकाऱ्याला मारहाण करण्याची धमकी आली नाही. मग आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाल्यावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एवढा हल्लागुल्ला का करावा? सुशांत सिंग याच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणात बाॅलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना एनसीबीने बोलावले, पण चौकशी अधिकाऱ्याचा, त्याच्या आई-वडिलांचा किंवा त्याच्या पत्नीचा धर्म कोणता आहे यासंबंधी कोणी जन्मदाखले व मॅरेज सर्टिफिकेट कॅमेऱ्यासमोर फडकावले नाहीत. समीर वानखेडे यांची कार्यपद्धती बरोबर आहे की नाही, त्यांच्यावरील आरोप खरे की खोटे, याची चौकशी चालू आहेच, पण धार्मिक व जातीचे मुद्दे काढून यापूर्वी चौकशी यंत्रणांवर कधी कोणी भडीमार केला नव्हता.…