अनंता दुबेले
कुडूस : वाडा तालुका डी प्लस झोन जाहीर झाल्याने येथे शेकडोंच्या संख्येने कारखाने आले आहेत. येथील कारखानदार व नागरिक गेल्या २० वर्षांपासून येथे आग्निशमन दलाची स्थापना व्हावी, याची मागणी करत असून आजही प्रतिक्षेतच आहेत.
वाडा तालुका हा औद्योगिकदृष्ट्या असुरक्षित असून मागील २० वर्षांत अनेक कारखान्यांना आग लागल्याचा घटना येथे घडल्या आहेत. अनेक कारखाने जळून खाक झाले आहेत; परंतु या सर्व दुर्घटनांनंतरही शासनाने कोणताही बोध आजतागायत घेतलेला दिसत नाही. येथे मोठी कारखानदारी असल्याने तालुक्यासाठी स्वतंत्र आग्निशमन दलाची निर्मिती करणे आवश्यक असताना सरकार दरबारी याबाबत उदासीनता दिसत आहे. तालुक्यासाठी आग्निशमन दल केंद्राची स्थापना करण्यात यावी, ही मागणी गेल्या २० वर्षांपासून येथील कारखानदार व नागरिक करत असून त्यांच्या पदरी उपेक्षाच आलेली दिसत आहे.
सुस्थितीत रस्ता, मुबलक वीज पुरवठा व अग्निशमन दल या आवश्यक असलेल्या मुख्य सुविधा देण्यास सरकार कमी पडत असून त्याचा मोठा फटका आम्हाला बसत असल्याची नाराजी कंपनी मालक व्यक्त करीत आहेत. तालुक्यात कारखान्यांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असून या आगीत कितीतरी कामगारांनी आपला जीव गमावला आहे, तसेच कोट्यावधी रुपयांचे अार्थिक नुकसान येथील कारखानदारांचे झालेले आहे.
तालुक्यात एखाद्या कंपनीला काही कारणास्तव आग लागण्याची घटना घडली, तर वाड्यात अग्निशमन दल केंद्र नसल्याने शेजारील भिवंडी, कल्याण, वसई आदी तालुक्यांतून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करावे लागत असते. हे शेजारील तालुके वाड्यापासून किमान ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर असल्याने तेथून अग्निशमन बंबाच्या गाड्या घटनास्थळी पोहचेपर्यंत ती कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झालेली असते. केंद्र सरकारच्या खुल्या धोरणानुसार, १९९५ मध्ये वाडा तालुका डी प्लस झोन म्हणून जाहीर करण्यात आला. त्यामुळे येथे शेकडो कंपन्यांनी आपले बस्तान बांधले आहे. हा आदिवासीबहुल तालुका असून येथील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने डी प्लस झोन जाहीर करण्यात आला आहे. येथे अनेक कारखान्यांची उभारणी झाली असून, विविध उत्पादनांची निर्मिती केली जात आहे.
तालुक्यात आतापर्यंत बेन्जो ऑरगॅनिक्स, मोनाटोना, भारत स्टील, रोलिंग डोंगस्ते, जे. आय. के, धोडीया, फॅब्युला कोटींग्ज, करिझ्मा यांसारख्या अनेक कंपन्यांना आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही वर्षांपूर्वी कोंढले गाव येथील कंपनीमध्ये झालेला रिॲक्टरचा स्फोट आणि नंतरचे वायूप्रदूषण इतके भयंकर होते की, ५ किलोमीटर परिसरातील ग्रामस्थ दोन दिवस आपले घर-दार सोडून आश्रयासाठी दुसऱ्या गावात नातेवाईकांकडे गेले होते.
प्रत्येक दुर्घटनांच्या वेळी भिवंडी, वसईहून अग्निशमन दलाची यंत्रणा मदतीसाठी मागवावी लागते. या तालुक्याची औद्योगिक सुरक्षितता लक्षात घेऊन येथे अग्निशमन दलाची स्थापना होणे, गरजेचे असून आजपर्यंत सरकारने या दिशेने पाऊले न उचलल्याने कंपनी मालक व वाडावासीय अग्निशमन दल केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.
…म्हणून अग्निशमन केंद्र गरजेचे
पाच वर्षांपूर्वी वाड्यातील उज्जैनी या आदिवासीबहुल गावात घरांना लागलेल्या आगीमुळे १५ आदिवासी कुटुंबाना बेघर व्हावे लागले होते. अशा घटना वारंवार घडत असतात, मात्र अन्य ठिकाणांहून निघालेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण कंपनी किंवा घर आगीत भस्मसात झालेले असते. त्यामुळे या ठिकाणी अग्निशमन दलाचे केंद्र असावे, अशी मागणी केली जात आहे.