नालासोपारा (वार्ताहर) : वसईतील जुन्या परिवहन बसेस अजूनही भंगाराप्रमाणे पडून असल्याने त्याचे इंजिन, टायर आणि बसचे भाग चोरीला जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून सतत संताप व्यक्त केला जात असला, तरी महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या बस या दुरुस्त होण्यासाठी गेल्या आहेत. तथापि, इतर बस पालिकेची जबाबदारी नसून त्या तिथेच पडलेल्या आहेत. त्यामुळे या बसचे करायचे काय? हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे.
वसईतील परिवहन बससेवा जवळजवळ एक-दीड वर्षे झाले बंद झाली आणि त्यानंतर नवीन बस ताफ्यात दाखल झाल्यावर सदर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली, परंतु नवीन बस आल्यानंतरही जुन्या बस भंगाराप्रमाणे पडून आहेत. यातील अनेक बसच्या काचासुद्धा फुटून रस्त्यांवर पडू लागलेल्या आहेत. यामुळे याठिकाणी चालण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रार केली जात आहे. याचबरोबर याच्या आजूबाजूला कामगार विसाव्यासाठी थांबलेले असतात, त्यांच्यासोबत त्यांची लहान मुले आणि स्त्रियासुद्धा थांबलेल्या असतात. त्याचबरोबर या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांनीही याबद्दल तक्रार केली आहे, परंतु महानगरपालिकेने यामध्ये आपली भूमिका संपलेली असल्याचे सांगितले आहे.
‘‘परिवहन सेवेमध्ये दोन प्रकारच्या बस आहेत. एक पालिकेच्या मालकीच्या असून त्या केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्या एकूण ३० बस असून उर्वरित बस ठेकेदारांच्या जबाबदारीच्या आहेत. ज्या बस पालिकेच्या मालकीच्या आहेत, त्यातील ८ बस दुरुस्त होण्यास गेलेल्या आहेत, तसेच इतर बसही दुरुस्त करून वापरण्यात येतील. इतर बस ही ठेकेदारांची जबाबदारी असल्याने त्यांची दुरुस्ती त्यांच्याकडून केली जाईल’’, असे परिवहन विभाग अध्यक्ष, प्रितेश पाटील यांनी माहिती देताना सांगितले.
ठेकेदारांकडून या बसकडे लक्ष दिले जात नाही, तसेच पालिका आणि ठेकेदार यांच्यातला आर्थिक व्यवहार पूर्ण होत नसल्याने या बस अजूनही अशाच पडून आहेत. महानगरपालिकेने पालिका अंतर्गत येणाऱ्या बसची जबाबदारी घेतली आहे, परंतु इतर बस तशाच पडून आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
‘या बसचा निकाल लवकर लावा’
आतापर्यंत परिवहन बसमधील सामान विकण्यात आले होते, परंतु आता त्या बसची तोडफोड होऊन त्याच्या काचा सर्वत्र टाकल्या जात आहेत. त्यामुळे येथे ये-जा करणाऱ्या नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. याचबरोबर आजूबाजूला राहती वस्ती असल्याने तसेच नागरिक या रस्त्यांवरून प्रवास करत असल्याने या बसचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी विनंतीही केली आहे.
असून अडचण…
पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बसेस दुरुस्ती होऊन त्यांचा वापर केला जाईल, असे मत मांडल्यानंतर इतर बसचे काय होणार? हा मोठा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे. ठेकेदाराने लवकरात लवकर याची जबाबदारी घेतली नाही, तर या बस अशाच पडून राहतील व त्या जागेचा उपयोगही करता येणार नाही.