Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये वर्चस्वासाठी झुंज

ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये वर्चस्वासाठी झुंज

विजेत्याचे उपांत्य फेरीतील स्थान होणार निश्चित

दुबई (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर १२ फेरीत ग्रुप १मध्ये शुक्रवारच्या (३० ऑक्टोबर) दुसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अव्वल स्थानासाठी झुंज आहे. या सामन्यातील विजेत्या संघाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल. त्यामुळे उभय संघ विजयासाठी प्रयत्न करतील.

इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेसह श्रीलंका संघांना हरवत चार गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडवर मात करताना ऑस्ट्रेलियाने तितकेच गुण मिळवले आहेत. मात्र, सरस धावगतीवर इंग्लिश संघाने वरचे स्थान पटकावले आहे. उभय संघांमधील मागील पाच सामन्यांचा निकाल पाहिल्यास इंग्लंडने ३-२ अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी सामन्यांत भिडले होते. त्यात यजमानांनी बाजी मारताना आघाडी घेतली. त्याचा बदला घेण्याची संधी ऑस्ट्रेलियाला चालून आली आहे.

दोन्ही संघांचे टी-वर्ल्डकपमधील सुरुवातीचे निकाल पाहता गोलंदाज मॅचविनर ठरलेत. डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्ससह ऑफस्पिनर मोईन अली आणि लेगस्पिनर अब्दुल रशीद या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. ख्रिस वोक्स आणि ख्रिस जॉर्डन या वेगवान दुकलीला अद्याप छाप पाडता आलेली नाही. लेगस्पिनर अॅडम झम्पा आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीची बाजू सांभाळली आहे. पॅट कमिन्स आणि जोश हॅझ्लेवुडची त्यांना बऱ्यापैकी साथ मिळाली आहे. उभय संघांच्या गोलंदाजीची कामगिरी पाहता इंग्लंडची बॉलिंग अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक वाटते.

गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे फलंदाजांचे अपयश झाकले गेले आहे. इंग्लंडकडून केवळ जेसन रॉयला अर्धशतकी मजल मारता आली आहे. त्याच्यानंतर जोस बटलर, जॉनी बेअर्स्टो आणि डॅविड मालनला दोन सामने मिळून दोन आकडी धावा आल्यात. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि लियाम लिव्हिंगस्टोनला एकेकदा फलंदाजी मिळाली तरी त्यांची मजल डबल फिगरमध्ये गेलेली नाही. ढेपाळलेली आघाडी फळी इंग्लिश संघासाठी चिंतेचे कारण आहे. ऑस्ट्रेलियाकडून फक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पन्नाशी पार करता आली आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याला सूर गवसला. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला हायसे वाटले आहे. माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसह विद्यमान कर्णधार आरोन फिंच आणि मार्क स्टाइनिसने फलंदाजीत थोडे फार योगदान दिले आहे. मात्र, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेललला दोन्ही आघाड्यांवर फॉर्म सापडलेला नाही. मिचेल मार्श यालाही अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही.

वेळ : सायं. ७.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -