Saturday, May 10, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

चाकरमान्यांचा खासगी प्रवास महागला

चाकरमान्यांचा खासगी प्रवास महागला

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या तोंडावर एसटीने प्रवासभाड्यात १७.१७ टक्क्यांची वाढ केली असतानाच मुंबईतील चाकरमान्यांचा खासगी प्रवास देखील महागला आहे. मुंबई-कोकण मार्गावरील खासगी बसप्रवासही २० टक्क्यांनी महागला आहे. इंधन दर आणि खड्ड्यांमुळे वाढलेला दुरुस्ती खर्च भाडेवाढीस कारणीभूत असल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सलग सुट्ट्या आणि सणासुदीचा काळवगळता हे दर कायमस्वरूपी लागू राहतील.



मुंबई-कोकण मार्गावर बससेवा देणाऱ्या ट्रॅव्हल्सचालक-मालकांची बैठक नुकतीच पार पडली. यात भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. दिवसेंदिवस वाढत जाणारे डिझेलचे दर, खड्डेमय रस्त्यांमुळे सतत वाढणारा दुरुस्ती खर्च आणि वारंवार बदलत राहणारे वाहतुकीचे नियम पाहता व्यवसाय करणे कठीण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दरवाढ हा एकमेव उपाय असल्याचे मत बहुतांश सदस्यांनी मांडले. चर्चेअंती किमान भाडेदरात २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.


एसटीच्या दीडपट भाडे घेण्यास परिवहन विभागाची मान्यता आहे. पण, आमचे दर एसटीपेक्षाही कमी आहेत. याउलट त्यांच्यापेक्षा अतिरिक्त सुविधा आम्ही देतो. गाड्या निमआराम प्रकारातील असतात तर ट्रॅव्हल्सची रचना पुश-बॅक, शययान, वातानुकूलित प्रकारची असते, असे बस चालक-मालकांचे म्हणणे आहे. नवे दर हे प्रवासी आणि व्यावसायिकांना परवडतील अशाप्रकारे ठरविण्यात आल्याची माहिती ट्रॅव्हल्सचालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अरविंद पाटील यांनी दिली.





Comments
Add Comment