‘पियाजा गांधी’तील पुतळ्याला वाहिली आदरांजली
रोम, इटली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १६ व्या जी-२० शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी इटलीच्या रोममध्ये दाखल झाले आहेत. करोना संक्रमणाने २०२०मध्ये जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतर थेट उपस्थिती दर्शवणारे हे पहिलेच जी-२० शिखर संमेलन ठरले आहे. आपल्या इटली दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोमच्या ‘पियाजा गांधी’ येाथे भेट देऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि पुष्पहार अर्पण केला. या दरम्यान ‘पियाजा गांधी’मध्ये जमलेल्या भारतीय समाजातील लोकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी ‘मोदी – मोदी’ अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत रोम आणि ग्लासगोमध्ये असतील. परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी हे २९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत जी २० देशांच्या समुहाच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी रोममध्ये राहतील. त्यानंतर २६ व्या ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (कॉप-२६) मध्ये आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या शिखर बैठकीतही ते सहभागी होण्यासाठी ते ब्रिटनच्या ग्लासगोला रवाना होतील.
शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक आरोग्य’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. तर दुसऱ्या दिवशी ‘प्रिन्स ऑफ वेल्स’कडून हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात खाजगी अर्थव्यवस्थेच्या भूमिकेवर भाष्य केले जाईल. यासोबतच दुसऱ्या दिवशी जागतिक नेते हवामान बदल आणि पर्यावरण, शाश्वत विकासासह इतर मुद्द्यांवरही चर्चा करतील.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इटली सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि रोममधील भारताचे राजदूत यांच्याकडून मोदींचे स्वागत करण्यात आले. इटालियन समकक्ष मारियो द्राघी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी यांचा रोम आणि व्हॅटिकन सिटी दौरा ३१ ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने मोदी इतर मित्र देशांच्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतील. तसेच त्यांच्यासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतील. व्हॅटिकनमध्ये मोदी हे पोप फ्रान्सिस तसेच परराष्ट्र मंत्री कार्डिनल पिट्रो पॅरोलिन यांची भेट घेतील.
स्पेनच्या पंतप्रधानांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात ट्रेवी फाउंडेशनला भेट देऊन होईल. यानंतर रोमा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित जी-२० परिषदेच्या दुसऱ्या सत्रात मोदी पुन्हा एकदा हवामान बदल आणि पर्यावरणावरील चर्चेत सहभागी होतील. दुसरे सत्र संपल्यानंतर मोदी स्पेनच्या पंतप्रधानांशी पंधरा मिनिटांची भेट घेणार आहेत. मोदी आणि जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्यात जवळपास अर्ध्या तासाची चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर पंतप्रधान मोदी सप्लाय चेनवर स्वतंत्रपणे आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत सहभागी होतील. यानंतर पंतप्रधान आपला इटली दौरा संपवून ब्रिटनमधील ग्लासगो येथे रवाना होतील.