Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाविजय तीन, मॅचविनर पाच

विजय तीन, मॅचविनर पाच

सलग तिसऱ्या विजयासह पाकिस्तानची सेेमीफायनल नक्की

दुबई (वृत्तसंस्था): सुपर १२ फेरीमध्ये (ग्रुप २) अफगाणिस्तानला हरवत विजयाची हॅट्रिक नोंदवतानाच पाकिस्तानने आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सलग तीन विजय मिळवणारा तो पहिला संघ आहे. तीन
विजयांत पाच मॅचविनर हे पाकिस्तानच्या सलग विजयांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

कर्णधार बाबर आझमच्या (५१) अर्धशतकानंतर आसिफ अलीने (नाबाद २५) एकाच षटकात मारलेल्या चार षटकारांमुळे पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानचा पाच विकेट आणि सहा चेंडू राखून पराभव केला. अफगाणिस्तानचे १४८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९ षटकांत पाच विकेटच्या बदल्यात पार केले. आझम आणि आसिफपूर्वी, डावखुरा फिरकीपटू इमाद वासिमने प्रभावी मारा करताना प्रतिस्पर्ध्यांना
१४८ धावांमध्ये रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आधी, न्यूझीलंड आणि परंपरागत प्रतिस्पर्धी भारतावर मात केली आहे. किवींविरुद्ध मध्यमगती गोलंदाज हॅरिस रौफ आणि मोहम्मद रिझवान चमकला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताची दाणादाण उडवली. त्यानंतर कर्णधार बाबरने मोहम्मद रिझवानसह प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पूर्ण केले.

बाबरने टाकले कोहलीला मागे

टी-ट्वेन्टी प्रकारात झटपट एक हजार धावा करणारा कर्णधार पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमने सातत्य राखताना आणखी एक अर्धशतक झळकावत टी-ट्वेन्टी प्रकारात कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण केल्या. त्याने २६ डावांमध्ये ही करामत साधली. बाबरने भारताचा कर्णधार विराट कोहलीला (३० डाव) मागे टाकले. या दोघांसह दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस (३१ डाव), ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच (३२ डाव) तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (३६ डाव) कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -